चर्चा तर होणारचः अकरावीत शिकणाऱ्या मुलानेच आईच्या विरोधात उभे केले निवडणूक पॅनल

0
6363
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः राजकारणात कुणीच कुणाचे नसते, असे म्हणतात. त्याचीच प्रचिती औरंगाबाद जिल्ह्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलानेच आईच्या विरोधात संपूर्ण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल उभे केले आहे. आईच्या विरोधात बंड करणारा हा तरूण कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू असून आदित्य असे त्याचे नाव आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून कन्नड तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत संजना जाधव यांनी पॅनेल उभे केले आहेत. त्यातच त्यांचा मुलगा आदित्य याने आईच्याच विरोधात वडिल हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनेलची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. आदित्य सध्या अकारावीत शिकतो. पुण्यात एका दाम्पत्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव यांना अटक झालेली आहे. त्यामुळे वडिलांच्या गैरहजेरीत आदित्यनेच वडिलांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. आदित्य कन्नडचे माजी आमदार रायभान जाधव यांच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे.

मंगळवारी आदित्यने पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनेलची घोषणा केली. हर्षवर्धन जाधव हे शेतकऱ्यांसाठी राजकारणात पुन्हा सक्रीय होत असून ते कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आदित्यने केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती. परंतु आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा राजकारणात सक्रीय होणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आता आई आणि मुलातील हा राजकीय सामना कसा रंगतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. पत्नी संजनाने आपल्याशी वैवाहिक संबंध संपुष्टात आणले असल्याचे हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून सांगितले होते. सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपणाला त्रास देत असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. मला समाधानाने जगू द्या, हवे तर कन्नड विधानसभा मतदारसंघातून तुमची मुलगी संजनाला निवडणूक लढवू द्या, अशी विनंतीही हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवेंना केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा