पंकजांसमोर चक्रव्यूहः राष्ट्रीय राजकाणात रमल्यास बीड-परळी निसटण्याचा धोका, नाही रमल्या तर…

0
699
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपच्या महाराष्ट्रातील फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लावण्यात आली आहे. राष्ट्रीय मंत्रिपदी वर्णी लावून त्यांनी राज्याच्या राजकारणाचा मोह सोडायला हवा, असे संकेतच जणू पक्षाने दिले आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाचा मोह सोडून राष्ट्रीय राजकारणात रमणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे. राष्ट्रीय राजकारणात रमल्या तर बीड-परळी हातून जाण्याचा धोका आणि नाही रमल्या तर पक्षाकडून निष्क्रियतेचा ठपका मारला जाण्याची भीती असा चक्रव्यूह पंकजा कसा भेदतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 बीड जिल्हा हा पंकजा मुंडेंच्या राजकारणाचा मूलाधार राहिला आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्या हातात गेल्यामुळे त्या कमालीच्या अस्वस्थ असतानाच भाजपकडून विधान परिषदेवर वर्णी लावून त्यांची अस्वस्थता दूर केली जाईल आणि बीडच्या राजकारणात त्या पुन्हा नव्या जोमाने सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. मात्र त्यांची विधान परिषदेवर तर सोडाच परंतु भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतही वर्णी लावण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेत आणखीच भर पडली होती.

आमदार मग तो विधानसभेचा असो की विधान परिषदेचा, त्यांच्याच भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे रहात असते. या दोन्ही पैकी एकही पद नसेल तर किमान पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत हुद्द्यावर असलेल्या नेत्याला कार्यकर्ते चिकटलेले असतात. कारण स्थानिक कार्यकर्त्यांची सगळीच कामे ही स्थानिक पातळीवरची असतात आणि स्थानिक पातळीवरची कामे राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेला नेता जेवढा प्रभावीपणे मार्गी लावू शकतो, तेवढा प्रभाव राष्ट्रीय राजकारणात सक्रीय नेत्याचा पडत नाही, असा आजपर्यंत राजकीय अनुभव आहे.

 आता पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून थेट राष्ट्रीय राजकारणात गेल्या आहेत. राष्ट्रीय मंत्री म्हणून भाजप ‘जन जन तक’ पोहोचवण्यासाठी एखाद्या राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. त्यामुळे पंकजांना त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा मोह सोडावा लागू शकतो. मतदारसंघात पुन्हा एकदा नव्याने घट्ट पाय रोवायचे असतील तर त्यांना परळीसाठी जास्तीत वेळ द्यावा लागेल. परंतु राष्ट्रीय राजकारणातील जबाबदाऱ्या पेलताना त्या परळीला वेळ देऊ शकतील का?, असाही प्रश्न आहे.

प्रदेश भाजपातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक हाती प्राबल्य लक्षात घेता जर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय राजकारणातच रमण्याची मानसिक तयारी केल्यास मग परळीत त्यांचा वारसदार कोण असेल? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय मंत्रिपदी लागलेली वर्णी हा आपला सन्नाम आहे, असे सांगणाऱ्या पंकजा मुंडे परळीचा मोह सोडतात, की राष्ट्रीय राजकारणात जाऊनही परळीवरच लक्ष केंद्रित करतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.

 महाराष्ट्रातून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागलेले अन्य नेते आणि पंकजा मुंडे यांच्या राजकारणात जमीन अस्मानचे अंतर आहे. विनोद तावडे, सुनिल देवधर आणि विजया रहाटकर यांना स्वतःच्या अस्मितेचा असा कोणताही मतदारसंघ नाही. ज्या बोरीवली २०१४ मध्येविधानसभा मतदारसंघातून विनोद तावडे निवडून आले होते, तेथे भाजपने कायम उमेदवार बदलेला आहे. विजया रहाटकर यांनी तर औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक वगळता अन्य कोणतीही निवडणूकच लढवलेली नाही.

 सुनिल देवधर हे आरएसएसचे स्वयंसेवक आहे आणि आरएसएसचे प्रतिनिधी म्हणूनच ते भाजपमध्ये सक्रीय आहेत. ते कायम त्रिपुरा, पश्चिम बंगाल अशा राज्यांचे भाजप प्रभारी म्हणून सक्रीय आहेत. राष्ट्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या उर्वरित तीन नेत्यांना फारसा जनाधारच नसल्यामुळे पक्षाने दिले त्यातच ते आनंद मानतात,पण पंकजांच्या राजकारणाचे मात्र तसे नाही. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात रमले तर बीड आणि परळी हातून जाण्याचा धोका आणि नाही रमले तर पक्षाकडून निष्क्रियतेचा ठपका मारला जाण्याची शक्यता अशा चक्रव्यूहात पंकजा मुंडेंचे राजकारण अडकल्याचे सध्या तरी दिसू लागले आहे. त्यातून त्या कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा