डिजिटल इंडियाचा पचकाः महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण दोन दिवस स्थगीत

0
153
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात डिजिटल इंडियाचा पचका झाला. कोविन ऍपमध्ये तांत्रिक बिघाडाला सामोर जावे लागल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण मोहीम स्थगीत करण्यात आली आहे. आता हा तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर लसीकरण कधी केले जाईल, याची घोषणा सोमवारी केली जाणार आहे.  त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रात लसीकरण होणार नाही. महाराष्ट्रातील लसीकरण रद्द करण्यात आले नाही तर स्थगीत करण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

१६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरण मोहीम राबवताना कोविन ऍपमध्ये तांत्रिक दोष येत होते. केंद्र सरकारकडून हे दोष दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना लसीकरण करताना पूर्णतः डिजिटल नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र कोविन ऍपमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक दोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शनिवारी ऑफलाइन नोंदणीला परवानगी दिली होती. पुढील सर्व नोंदी ऍप मार्फतच करण्यात याव्यात, असे केंद्र सरकारने सूचित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण दोन दिवस स्थगीत करण्यात आले आहे. आज रविवार आणि सोमवारी मुंबईत लसीकरण केले जाणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

विशेष म्हणजे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मुंबईत ४ हजार १०० लोकांचे लसीकरण करण्यात येणार होते. मात्र १ हजार ९२६ लोकांचेच लसीकरण करण्यात आले आहे.

कोविन ऍपमधील तांत्रिक दोषांबाबत केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारपूर्वी राज्यातील लसीकरण सुरू होणार नाही, अशी शक्यता आहे, असेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, राज्यातील नियोजित कोरोना लसीकरण रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यात चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

लसीकरणासाठी फक्त तीनच संधीः कोरोना लसीकरणासाठी कोविन ऍपमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. या ऍपवर नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्याशी लसीकरणासाठी संपर्क साधला जातो. मात्र या ऍपवर नोंदणी केल्यानंतर संपर्क साधूनही लाभार्थी लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. अशा लाभार्थ्यांना लसीकरण करून घेण्यासाठी तीन वेळा संधी दिली जाणार आहे. तीनवेळा संपर्क साधूनही नोंदणी केलेला लाभार्थी लसीकरणासाठी आला नाही तर त्याला लसीकरणातून बाद केले जाणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा