महापुराचा तडाखाः राज्यात आतापर्यंत १३७ जणांचा बळी, ७३ जण अजूनही बेपत्ता

0
88
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीच्या तडाख्यात आतापर्यंत १३७ जणांचा बळी गेला आहे तर ७३ जण अजूनही बेपत्ता आहेत. महापूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनेत ही झालेली जिवित्त हानी असून त्यात ५० जण जखमी झाले आहेत.

 मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसह मुंबई आणि ठाण्यालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला.

या जोरदार पावसाच्या तडाख्यात रत्नागिरी, रायगड आणि सातारा या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेली. त्यात ४७ जणांचा बळी गेला आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार तळीये गावातील २३ जण अजूनही बेपत्ता असून मातीच्या ढिगाऱ्याखाली त्यांचा शोध घेणे सुरू आहे. रायगड जिल्ह्यात या संकटाने ५२ जणांचा बळी गेला तर २८ जण जखमी झाले आहेत.

 सातारा जिल्ह्यात दरडी कोसळण्यासह घडलेल्या विविध घटनांत ३७ जणांचा मृत्यू झाला. तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २१ जणांचा बळी गेला आहे तर १४ जण बेपत्ता आहेत. रत्नागिरीत ७ जण जखमी झाले आहेत.

 या महापूर संकटाने ठाणे जिल्ह्यात १२, पुणे जिल्ह्यात २, मुंबई जिल्ह्यात ४ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जणांचा बळी गेला आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या या नऊ जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ३१३ लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

महापुराने उद्भवलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील या नऊ जिल्ह्यात एनडीआरएफची ३४ पथके मदत आणि बचाव कार्यात उतरल्या आहेत. त्याबरोबरच एसडीआरएफची ४ पथके, तटरक्षक दलाची तीन, नौदलाची ७ आणि भारतीय लष्कराची ३ पथकेही युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

 कोल्हापुरात पुन्हा महापुराचा धोकाः कोल्हापूर जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा काहीसा सैल होत असतानाच राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ५१ फुटावर आहे. दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरीही धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणे रविवारी सायंकाळी शंभर टक्के भरले. त्यामुळे रविवारी सायंकाळी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे घडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता आणखी दोन आणि त्यानंतर पुन्हा एक असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळ पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याचा धोका आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा