अतिवृष्टीमुळे राज्यातील २९० रस्ते बंद, ४६९ रस्त्यांची वाहतूक खंडित

0
75
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  राज्याला बसलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे तब्बल २९० रस्ते बंद झाले असून ४६९ रस्त्यांची वाहतूक खंडित झाली आहे. राज्यातील तब्बल १४० पूल व मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नुकसान झालेले रस्ते आणि पुलांच्या नुकसाची आढावा घेण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

राज्यातील कोकण व पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना दौरा करावा आणि नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी दिले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसात पुणे तसेच कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते व पूल नुकसानग्रस्त झाले आहेत. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना मं चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार, सातारा व पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता साळुंखे, सांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता उकिर्डे, कोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, पालघर व ठाणेमध्ये नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव रामगुडे हे भेट देणार आहेत. या अधिकाऱ्यांनी शासनास दररोज अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

हाड दुर्घटनेतील जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचारः अतिवृष्टीमुळे महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १६ जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार असून अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिली. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून ज्या जखमींवर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही जखमींवर अतिदक्षता रुग्णालयात योग्य उपचार सुरू असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. दरडग्रस्तांना सर्व आवश्यक ती मदत पोहोचविण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलून उपाययोजना करण्यात येणार आहे. या नैसर्गिक संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

रोगराई पसरू नये म्हणून खबरदारीः कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय पूरग्रस्त भागात रोगराई पसरणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. डेंग्यूसह इतर रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्यात आली आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा