तुम्ही आराम करा, यापुढे तुमच्यावरची वारी मी करत जाईनः धनंजय मुंडेंनी दिला वृद्ध दाम्पत्याला धीर

0
147

बीड: आम्ही चार धाम केले, अनेक वर्ष वाऱ्या करत आहोत, निसर्गाने आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला, अशी व्यथा गेवराई तालुक्यातील मिरकाळा  येथील एक वृद्ध दाम्पत्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आज मांडली. त्यावर बाबा, तुम्ही आता आराम करा, मी तुमचा मुलगा आहे असं समजा, यापुढे तुमच्यावरची वारी मी करत जाईन, असे म्हणून त्या वृद्ध दाम्पत्याला मुंडे यांनी धीर दिला.

मुंडे यांनी आज अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. मुंडे आज गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर गेले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजय सिंह पंडित  महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

परतीच्या जोरदार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल असा विश्वास मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला. मुंडे यांनी माजलगाव तालुक्यातील तालखेड-धर्मेवाडी, श्रृंगारवाडी, फुले पिंपळगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

फुले पिंपळगाव येथील शेतकरी शेख शब्बीर शमशोद्दिन यांच्या चार एकर शेतातील सोयाबीनचे क्षेत्र यामुळे वाया गेल्याचे दिसून आले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असून मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात असून शासनस्तरावरून यापूर्वी पंचनामे झाले आहेत. परंतु सरकार म्हणून या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल, तसेच आंतरपिकांचाही समावेश पंचनाम्यांमध्ये करण्यात यावा अशा सूचना मुंडे यांनी संबंधितांना दिल्या.

विमा कंपनीने प्रशासकीय पंचनामे ग्राह्य धरावेः बीड जिल्ह्यातील १७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पिकविमा भरलेला असून, झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला देण्यासाठी अद्ययावत अप निर्माण केले आहे. त्याचबरोबरीने विमा कंपनीने कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत याबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा