पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच एचएससीचा निकाल उद्या, दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे.
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी विषयनिहाय मिळवलेले गुण त्यांना बोर्डाच्या वेबासाइटवर पाहता येणार आहेत. तसेच निकालाची प्रिंटऑऊटही काढता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic.in किंवा hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या वेबसाइटवर पाहता येतील. दुपारी १ वाजेनंतर या लिंकवर बारावीचे निकाल उपलब्ध असतील. यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाल्याने त्याचा परिणाम निकाल जाहीर करण्यावर झाला आहे.
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे http://verifiation.mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाईटवरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.गुणपडताळणीसाठी १७ जुलै ते २७ जुलैपर्यंत तर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन शुल्क भरून अर्ज करता येतील.