उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल

0
265
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या शुक्रवार १६ जुलै रोजी दुपारी १:००वा. जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

एकूण आठ माध्यमानुसार सन २०२०-२१ वर्षातील एसएससी (इयत्ता १० वी) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इयत्ता १०वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्द्तीनुसार इयत्ता ९ वीचा अंतिम निकाल, इयत्ता १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता १० वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे.

मंडळाने विहित कार्यपध्द्तीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे. २८ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनसार सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १०वी) श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा