राजकीय पक्षांचा विरोध असूनही ओबीसीच्या रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
136
प्रातििनिधिक छायाचित्र.

मुंबईः ओबीसींचे अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राजकीय पक्षांचा दबाव असतानाच राज्य निवडणूक आयोगाने नागपूर, नंदूरबार, धुळे, अकोला, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील ओबीसींच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

स्थानिक स्वराज संस्थांतील ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हे आरक्षण परत मिळवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी दबाव टाकल्यामुळे राज्य सरकारची धावाधाव सुरू आहे.

ओबीसींचे हे अतिरिक्त आरक्षण परत मिळवण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग नेमला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याचा फटका सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत बसणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप हे राजकीय पक्ष ओबीसींचे अतिरिक्त आरक्षण पुन्हा लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये, यासाठी आग्रही आहेत. असे असतानाही राज्य निवडणूक आयोगाने हे आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे  धुळे, नंदूरबार, वाशिम, अकोला आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि या जिल्ह्यातील ३३ पंचायत समित्यांतील ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार २९ डून ते ५ जुलै दरम्यान नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील. ६ जुलै रोजी अर्जांची छानणी होईल. १४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळात मतदान होईल. २० जुलै रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

या निवडणूक कार्यक्रमानुसार धुळ्यातील १५, नागपूरच्या १६, अकोल्यातील १४, वाशिमच्या १४ आणि नंदूरबारच्या ११ जिल्हा परिषद जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठीही पोटनिवडणूक होत असून धुळ्यातील ३०, नागपुरातील ३१, अकोल्यातील २८, वाशिममधील २७ आणि नंदूरबारमधील १४ पंचायत समिती गणासाठीही पोटनिवडणूक होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा