थकीत वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे उद्या घरासमोरच सहकुटुंब आक्रोश आंदोलन

0
73
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः दिवाळी तोंडावर आली तरी एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासूनचे वेतन अद्यापही देण्यात आले नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचारी उद्या (सोमवारी) त्यांच्या घरासमोर बसून आक्रोश आंदोलन करणार आहेत. दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले नाही, तर ते संपावर जातील, असा इशाराही महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) दिला आहे.

 यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी थकीत वेतन, वाढीव महागाई भत्ता आणि सणाची उचल दिवाळीपूर्वी देण्याच्या मागणीसाठी इंटकच्या वतीने राज्यभरातील जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. तरीही एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन न मिळाल्यामुळे उद्या सोमवारी सर्व कर्मचारी आपल्या राहत्या घरासमोर बसून सहकुटुंब आक्रोश आंदोलन करतील, असे इंटकचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी सांगितले.

 दिवाळी तोंडावर आलेली असताना  ऑगस्ट महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन देण्यात आले नाही. हा वेतन प्रदान अधिनियम १९३६ मधील तरतुदींनुसार फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने तीन महिन्यांचे वेतन देण्यात यावे किंवा एसटी महामंडळावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी इंटकने कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा