नवनीत राणांकडून कार्यकर्त्याच्या पत्नीचा अश्लील भाषेत बोलून अपमान, महिला आयोगाची नोटीस

0
815
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने पत्नी आणि १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दुसरा घरोबा केला. याबाबत दाद मागण्यासाठी पीडित महिलेने खासदार नवनीत राणा यांना फोन केला असता त्यांनी अर्वाच्च आणि अश्लील भाषेत बोलून अपमान केला. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून खा. राणा यांना नोटीस बजावली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात पहिले लग्न झालेले असताना देखील पहिल्या पत्नीला अंधारात ठेवत दुसरे लग्न केलेल्या आणि त्यानंतर पहिली पत्नी तसेच तिच्या १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या एका इसमाविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. या घटनेमध्ये पीडित महिलेने दाद मागण्यासाठी म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना फोन केला असता त्यांनी अर्वाच्च आणि अश्लील भाषेत तिचा अपमान केला. कारण या महिलेचा पती हा नवनीत राणा यांच्या जवळचा आणि पक्षाचा पदाधिकारी असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमरावती पोलिसांना याबाबत तत्काळ कारवाई करून याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून खा. नवनीत राणा यांनी या प्रकरणी योग्य तो खुलासा लेखी स्वरुपात द्यावा, असेही निर्देश राज्य महिला आयोगाने त्यांना दिले आहेत, असेही चाकणकर यांनी म्हटले आहे.

पीडित महिलेने खासदार नवनीत राणा यांना फोन केला असता त्यांनी तक्रार ऐकूनही घेतली नाही आणि त्या महिलेचा नंबर ब्लॉक करून टाकला. त्यानंतर पीडित महिलेने दुसऱ्या नंबरवरून खासदार राणा यांना कॉल केला असता त्यांनी अत्यंत अश्लील भाषेत बोलून पीडित महिलेचा अपमान केला. खासदार राणा यांनी आपल्यासोबत जे संभाषण केले ते अतिशय अश्लील भाषेत होते आणि ते मानहानी करणारे होते, असे पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. खासदार राणा यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही पीडित महिलेने या तक्रारीत केली आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 पीडित महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला १७ जानेवारी रोजी प्राप्त झाली. ही तक्रार प्राप्त होताच, त्याच दिवशी राज्य महिला आयोगाने खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावून लेखी खुलासा करण्यास सांगितले आहे. आता नवनीत राणा या नोटिसीला काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा