महाराष्ट्रासाठी उद्याचा दिवस महत्वाचाः ३० जिल्हे व २५ महापालिका क्षेत्रांत लसीकरणाचा ड्राय रन

0
28
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लवकरच लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचाच एक म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या, ८ जानेवारी  रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महापालिका क्षेत्रांत कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणजेच ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर पूर्वतयारीसाठी २ जानेवारी रोजी देशभरात ड्राय रन घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. या चार जिल्ह्यांपाठोपाठ आता ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेतला जाणार आहे.

या मोहिमेची पूर्वतयारी आज करण्यात असून त्यामध्ये राज्यस्तरावरुन जिल्हयांचे यूजर आयडी तयार करणे, जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम झाले. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपींग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शितसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी १ ते ४ आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते शारीरिक अंतर राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

एका केंद्रावर २५ जणांचे लसीकरणः ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा