महिला अत्याचारात महाराष्ट्र कुठे?, राज्य सरकार सार्वजनिक करणार इत्यंभूत डेटा!

0
41
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशातील महिला अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र नेमका कुठे आहे? महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण महाराष्ट्रात किती आहे? याची सर्व आकडेवारी लोकप्रतिनिधी आणि माध्यमांसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली.

 गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आज सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील महिला अत्याचाराबाबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला खा. सुप्रिया सुळे, राज्यातील महिला लोकप्रतिनिधी आणि विविध महिला संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात राज्यात महिलांवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचाराची संपूर्ण माहिती आणि त्याच्याशी संबंधित डेटा गृह विभागाकडून महिला लोकप्रतिनिधींना देण्यात आला आहे. महिला अत्याचाराबाबतचा हा लेखाजोखा माध्यमे आणि राज्यातील अन्य नागरिकांनाही पाहता येईल, असा ठेवण्यात यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. ती मागणी मान्य करण्यात आली असून हा डेटा लवकरच सर्वांना पाहता येईल, असे खा. सुळे म्हणाल्या.

 सुशांतसिंह प्रकरणी फेक अकाऊंट्स हे षडयंत्रः सुशातसिंह राजपूत मृत्युप्रकरणीही सुळे यांनी भाष्य केले. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियाची ८० हजार फेक अकाऊंट्स काढण्यात आली. हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. अशा प्रकारचा वापर एखादा राजकीय पक्ष करू शकतो, ही बाबच अत्यंत गंभीर आहे आणि हा एकूणच प्रकार किळसवाणा असल्याचे सुळे म्हणाल्या. राजकीय मतभेद असून शकतात. सत्ताधारी पक्षाबद्दल रागही असू शकतो. पण एखाद्या राजकीय पक्षाने एवढ्या खालच्या स्तराला जाऊन किळस यावा अशा पद्धतीने या प्रकरणाचा वापर करणे गंभीर असल्याचेही त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा