नेमका कसा असतो तुरूंग? आता तुरूंग पर्यटनाला जा आणि प्रत्यक्षच बघा!

0
520
प्रातिनिधिक छायाचित्र.

नागपूरः तुरूंगवासाची शिक्षा कुणाच्याही वाट्याला येऊ नये असे म्हणतात. परंतु चित्रपट, मालिकांमधून जो तुरूंग बघायला मिळतो, त्यामुळे खरंच तुरूंग नेमका असाच असतो की यापेक्षा वेगळा?, असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात पडतो आणि कुतुहल निर्माण करतो. आता तुम्हाला हे कुतुहल उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यात तुरूंग पर्यटनाला सुरूवात होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घोषणा केली.

२६ जानेवारी रोजी तुरूंग पर्यटनाला प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन होईल. प्रजासत्ताक दिनापासून पुण्याचा येरवडा तुरूंग पर्यटनासाठी खुला होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील सर्वच तुरूंगात ही योजना राबवण्यात येणार आहे.

 राज्यात ६० तुरुंग आहेत. या तुरुंगात जवळपास २४ हजार कैदी आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरुंगात आहेत. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत म्हणून गृह विभागाच्या वतीने तुरूंग पर्यटनाला सुरुवात करण्यात येत आहे, असे देशमुख म्हणाले.

 तुरूंग पर्यटनामुळे तुरुंगात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची ठिकाणे पाहता येणार आहेत. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुण्याच्या येरवडा कारागृहातच पुणे करार झाला, ती जागा व्यवस्थित आहे. येरवडा कारागृहात महात्मा गांधींना ज्या बराकीत ठेवण्यात आले होते, त्या बराकीचेही संवर्धन करण्यात आले आहे. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ठेवण्यात आलेले सेलही आहेत, तेही विद्यार्थी- नागरिकांना बघता येतील. इतिहासाचे संशोधन करणाऱ्यांनाही याचा फायदा होईल, असेही देशमुख म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा