मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

0
20
संग्रहित छायाचित्र.

मुंबई मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधी पक्ष भाजपने सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. आपले अपयश लपविण्यासाठी आणि चर्चा टाळण्यासाठी सरकारने दोन दिवसांचेच अधिवेशन घेतल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेतला. मराठा आरक्षण लागू करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या आदी मागण्यांचे फलक घेऊन भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. जनतेचे प्रश्न मांडता येऊ नयेत, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नच उपस्थित होऊ नये, यासाठी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मंत्र्यांच्या बंगल्यावर जरुर खर्च करा पण आधी शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. दिल्ली, अमेरिकेवर बोलल्याने राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यांना बांधावर जाऊन दिलेले आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही आवाज बुलंद करू, असा इशाराही फडणवीसांनी दिला. तर विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यासमोर मराठा आरक्षण, शेतकरी मदत, कोरोना असे अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चाच करायची नाही म्हणून दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन ठेवल्याचा आरोप केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा