‘काला धन लाने का के नही लाने का?’: भास्कर जाधवांनी केली मोदींची नक्कल, विधानसभेत हंगामा

0
385
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चांगलीच जुंपल्याचे चित्र आज पहायला मिळाले. राज्यातील विजेच्या मुद्यावर सभागृहात चर्चा सुरू असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यांनी ‘काला धन लाने का के नही लाने का…?’  अशी वाक्ये खास मोदी शैलीत म्हटली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आणि त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना तत्काळ निलंबिद करण्याची मागणी केली. प्रधानमंत्र्यांविषयी अंगविक्षेप करून बोलताना लाज वाटली पाहिजे, असे सांगत जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभेत चर्चा सुरू असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाख रुपयांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे एका प्रश्नाचे उत्तर देत असताना या वादाला सुरूवात झाली. कोरोनामुळे आपल्याला १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करता आली नाही, असे सांगतानाच नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा संदर्भ दिला. प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख रुपये जमा करणार असे म्हटले होते, ते केले नाहीत, असे राऊत म्हणाले.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

राऊत यांच्या या विधानावर फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेत राऊतांना आव्हानच दिले. मी आव्हान देतो की, प्रधानमंत्र्यांनी असे म्हटल्याचे वाक्य आणून दाखवावे नाहीतर देशाची माफी मागावी. वाट्टेल ते बोलायचं हे चालू देणार नाही. आम्ही तुमच्या नेत्यांबद्दल बोलू का? हे कामकाजातून काढून टाका, असे फडणवीस म्हणाले.

यावरच बोलताना २०१४ च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात जमा करतो, असे मोदींनी म्हटले होते, असे राऊत म्हणाले. त्यावरही आक्षेप घेत मोदींनी असे म्हटलेच नसल्याचे फडणवीस म्हणाले.

याच दरम्यान हस्तक्षेप करत भास्कर जाधव बोलण्यासाठी जागेवर उभे राहिले आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या शेलीत त्यांची वाक्ये बोलून दाखवली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होण्यापूर्वी शंभर वेळा म्हणाले आहेत की, ‘ काला धन लाने का के नही लाने का? तो लाने का… लाने का तो कहाँ रखने का? यूं ही रखने का’,  असे ते बोलले आहेत, असे भास्कर जाधव मोदींची नक्कल करत म्हणाले. हे पाहून देवेंद्र फडणवीस आणखीच संतापले. सभागृहात देशाच्या प्रधानमंत्र्यांची नक्कल करणे योग्य नव्हे. सभागृहात असा पायंडा पडता कामा नये. प्रधानमंत्र्यांची नक्कल या सभागृहात चालणार आहे का? प्रधानमंत्र्यांची नक्कल करणे चुकीचे आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे लाज, असे फडणवीस म्हणाले.

 त्यानंतरही भास्कर जाधव काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पुन्हा उभे रहात स्पष्टीकरण दिले. मी काय बोललो , ते शांतपणे ऐकून घ्या. मी म्हणालो २०१४ मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होण्यापूर्वी ते कसे बोलले, ते मी सांगितले. तेव्हा ते प्रधानमंत्री नव्हते. आता तुम्ही ही चलाखी करत आहेत की प्रधानमंत्री असे बोललेच नाहीत. तुम्ही म्हणताय की ते प्रधानमंत्री होण्यापूर्वी बोलले. तसेच मीही सांगतोय की ते प्रधानमंत्री होण्यापूर्वी असे म्हणाले. याचा अर्थ मी प्रधानमंत्र्यांची नक्कल केली नाही तर भाजपच्या उमेदवाराची नक्कल केली, असे भास्कर जाधव म्हणाले.

 भास्कर जाधव यांच्या या स्पष्टीकरणानंतरही भाजपच्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. त्यावर भास्कर जाधव यांनी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे सांगितले. परंतु अंगविक्षेप मागे घेण्याचे कुठलेही आयुध उपलब्ध नाही. भास्कर जाधव अजूनही हा विषय थट्टेने घेत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. प्रधानमंत्र्यांच्या अवमान होणार असेल तर हक्कभंग आणला जाईल. त्यांनी अंगविक्षेप केल्याचे मान्य केले आहे, त्यांनी माफी मागितील पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या या मागणीवर भास्कर जाधव पुन्हा बोलले. मी मागू शकत नाही. मी शब्द मागे घेतले आहेत, असे जाधव म्हणाले. त्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरू राहिल्याने विधानसभाध्यक्षांनी सभागृहाचे काम तहकूब केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा