कडक निर्बंध की लॉकडाऊन?: सर्वसमावेशक एसओपी तयार करण्याचे काम सुरूः मुख्यमंत्री

0
77
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोनाची लाट थोपवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावले जाणार हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या निर्बंधांसाठी सर्वसमावेशक एसओपी तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सीजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली.  या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी. डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

कोरोनाची मोठी लाट थोपवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी. लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती परत एकदा आपण प्रधानमंत्र्यांना करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाशी लढा देताना सुविधा- चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली. लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र ही गती आणखी वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ. पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल, आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता तो ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे,  रेमडेसिवीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढवणे यावर कार्यवाही झाली आहे, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी दिली. 

टास्क फोर्सने केल्या महत्वाच्या सूचनाः

-रेमडेसिवीरचा अवाजवी वापर थांबवाः आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सीजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सीजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबवणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.

सोसायट्यांतच विलगीकरण कक्ष, ऑक्सीजन कॉन्सट्रेटरः ९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांत विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी. मुंबई महापालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे.

-रुग्णाची आधी ६ मिनिटे वॉक टेस्टः डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत.  तरुण रुग्णांना देखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे.

-नियम मोडल्यास मोठा दंडः ऑक्सीजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा  मोठ्या प्रमाणावर  उपयोग करून घेणे आदी सूचना करण्यात आल्या.

ऑक्सीजन उपलब्धतेसाठी प्रयत्नः सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सीजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतुकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

११ जिल्ह्यांत बेड्सच उपलब्ध नाहीतः ४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले.  सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतो आहे. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटिव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे. काल, शनिवारी रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख अॅन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सीजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदूरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे, अशी माहिती डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा