नागपूर जिल्हा परिषद काँग्रेसच्या हातात, अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची बाजी!

0
309
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील नागपूर, धुळे, पालघर, नंदूरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले असून राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवरच भाजपला रोखण्यात काँग्रेसला यश आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने अनपेक्षित विजय मिळवला. तर अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

 नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण 58 जागांपैकी काँग्रेसला 30, राष्ट्रवादी 10, भाजपला 15 तर शिवसेना, शेकाप आणि अपक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. यापूर्वी नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र ही जिल्हा परिषद हातातून गेल्याने भाजपला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरपासून झाली असून स्थानिक स्वराज संस्थेवर बसवलेली पकड उद्धवस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत भाजप निवडणूक घेणे टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आज ही निवडणूक झाली आणि ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत, त्याच जिल्ह्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली, त्याची दखल महाराष्ट्र घेईल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हाणला आहे.

 अकोल्यात वंचि बहुजन आघाडीचे वर्चस्वः अकोला जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी 22 जागा जिंकून वंचित बहुजन आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. शिवसेनेने 13, भाजपने 7, काँग्रेसने 4, राष्ट्रवादीने 3 आणि अपक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला.

नंदूरबारमध्ये भाजप-काँग्रेस समसमान: नंदूरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून, एकूण 56 जागा असलेल्या जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. प्रत्येकी 23 जागा जिंकत भाजपा आणि काँग्रेस सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. तर शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र गेल्या वेळी केवळ एक जागा जिंकणार्‍या भाजपाने 23 जागा जिंकत यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसची काहीशी पीछेहाट झाली आहे.

धुळ्यात भाजपचे वर्चस्व: धुळे जिल्हा परिषदेत भाजपने 56 पैकी 39 जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. या ठिकाणी काँग्रेसला 7, शिवसेनेला 4 , राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

वाशिममध्ये अपक्ष जोरात: वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांपैकी तब्बल 19 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जिंकल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी 7 तर काँग्रेसने 9 जागा जिंकल्या आहेत.

 पालघरमध्ये शिवसेनेची मुसंडीः पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी 18 जागा जिंकून शिवसेनेने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 15, भाजपने 10, माकपने 6, बविआने 4, काँग्रेसने 1 तर अपक्षांनी 3 जागा जिंकल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा