अजित पवारांचे बंड फसले?, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजर

0
881
संग्रहित छायाचित्र.

अजित पवारांचे बंड फसले?, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजर

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार दिवस मावळण्याच्या आतच पुन्हा राष्ट्रवादीत परतले असतानाच सकाळपासून नॉटरिचेलबल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे वाय. बी. सेंटरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजर झाले. त्यामुळे अजित पवारांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणार्‍या भाजपला जोरदार झटका बसला आहे.

अजित पवारांनी शुक्रवारी रात्री बारा वाजता आमदारांना फोन करून पहाटे धनंजय मुंडे यांच्याच बंगल्यावर बोलावले होते. तेथून या आमदारांना राजभवनावर नेण्यात आले होते आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उरकण्यात आला होता. मात्र धनंजय मुंडे हे या शपथविधीला हजर नव्हते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

धनंजय मुंडे शपथविधी कार्यक्रमाला नव्हते तरी सकाळपासून घडलेल्या राजकीय महानाट्यादरम्यान त्यांचा फोन नॉटरिचेबल होता. त्यामुळे अजित पवारांच्या बंडात तेही सहभागी असल्याची चर्चा होती. मात्र आता सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजर झाले. पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ते थेट बैठकीच्या कक्षात पोहोचले. धनंजय मुंडे यांच्यासारख्या बड्या नेत्यासह 11 पैकी 8 आमदारांनी घरवापसी केल्यामुळे अजित पवारांचे बंड फसल्यात जमा असल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा