‘पहाटे ४ वाजता ‘मिर्ची हवन’ करून फडणवीसांनी घेतली होती दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ’

2
3827
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आकाराला येत असतानाच कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्या दिवशी पहाटे ४ वाजता पत्नी अमृता फडणवीसांसह ‘मिर्ची हवन’ केले होते. मध्य प्रदेशातील नालखेडा येथील बालगामुखी मंदिराच्या पुजाऱ्याकडून फडणवीसांनी हे हवन करून घेतले होते. ‘मिर्ची हवन’ केल्यामुळेच उत्तराखंडातील हरिश रावत सरकार वाचले होते, असे फडणवीसांना कुणी तरी सांगितले होते. त्यामुळे त्यांनीही ‘मिर्ची हवन’ करून घेतले. ‘मिर्ची हवन’ करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच फडणवीसांनी शपथविधीच्या वेळी त्यांच्या आवडीच्या निळ्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते, असा दावा पत्रकार सुधार सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेटः हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येणारच अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवारांशी संधान सांधून देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजकीय भूकंप घडवून आणला होता. या एकूणच घडामोडींचा परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे. या पुस्तकात महाविकास आघाडीची स्थापना आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी या दरम्यान घडलेल्या राजकीय घटना-घडामोडींचा मागोवा घेण्यात आला आहे.

उत्तराखंडमधील हरिश रावत सरकारने सभागृहात बहुमत गमावल्यानंतर त्यांचे बंधू जगदीश रावत मिर्ची हवन करण्यासाठी तातडीने बागलामुखी मंदिरात गेले होते. अखेर रावत आपले सरकार वाचवण्यात यशस्वी झाले होते. तेव्हापासून बागलामुखी मंदिर राजकीय नेते आणि उद्योगपतींमध्ये चांगलेच नावारूपाला आले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तुम्ही हे ‘मिर्ची हवन’ केले तर तुम्ही दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकता, असे देवेंद्र फडणवीसांना सांगण्यात आले होते. तत्पूर्वी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची धोक्यात आली, तेव्हा तेव्हा अनेकदा फडणवीसांनी मिर्ची हवन केल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. एकदा तांत्रिकाने मिर्ची हवन करण्यात आले, तांत्रिकाला दक्षिणा देण्यात आली आणि ते मध्य प्रदेशला निघून गेले. त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था प्रसाद लाड यांनी केली होती, असे पुस्तकात म्हटले आहे.

महाविकास आघाडीची मोट बांधण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सिल्व्हर ओक या निवासस्थानाचे राजभवनापासूनचे ड्रायव्हिंग अंतर अवघ्या १५ मिनिटांचे आहे. शरद पवार त्या दिवशी पहाटे ३ वाजेच्या सुमारास झोपण्यासाठी बेडरूम गेले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तयार होत होते. दुष्ट आत्म्यांना पळवून लावण्यासाठी काळ्या रंगाचे जॅकेट घाला असा सल्ला फडणवीसांना तांत्रिकाने दिला आणि फडवीसांनीही शपथविधीच्या वेळी त्यांच्या आवडीचे निळे जॅकेट घालण्याऐवजी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे. २३ नोव्हेंबर२०१९ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत, हे ऐकून देवेंद्र फडणवीस प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यामुळे आपणाला काहीही करून उद्या, २३ नोव्हेंबर २०१९ रोजी राजभवनात शपथ घ्यावीच लागेल, असे त्यांनी अजित पवारांना सांगून टाकले. आधी शपथ घेणे सर्वात महत्वाचे, बाकीचे नंतर बघू, असे फडणवीस म्हणाले. त्यावर अजित पवारांनी राष्ट्रपती राजवट आणि अन्य प्रक्रियेचे काय अशी विचारणा करत घाई करू नका, अशी विनंती फडणवीसांना केली. ‘चर्चा नंतरही केली जाऊ शकते. शक्य तितक्या लवकर शपथविधी होणे सर्वात महत्वाचे आहे. त्यानंतर बाकीच्या प्रलंबित मुद्यावर तोगडा काढता येईल,’ असे फडणवीस म्हणाले होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा