देवेंद्र फडणवीस आता ‘महाराष्ट्राचे सेवक’, ‘मी पुन्हा येणार नाही’ची मनाशी बांधली खूणगाठ!

0
127

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन…’च्या स्वप्नाचा विचका करून टाकला. कोणालाही सरकार स्थापन करता न आल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लगेचच ‘महाराष्ट्राचा सेवक’ बनले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवरील ही नोंद लक्षवेधी ठरली आहे. अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर शिवसेना अडून बसल्यामुळे भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होऊन देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असे कळवावे लागले. नंतर शिवसेनेलाही निमंत्रण मिळून सत्ता स्थापन करता आली नसली तरी शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू केल्यामुळे आता आपणाला विरोधी पक्षात बसूनच महाराष्ट्राची सेवा करावी लागणार आहे, याची खात्री देवेंद्र फडणवीस यांना पटली आणि त्यांनी लगेच त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘Chief Minister Of Maharashtra’ हे स्टेटस काढून ‘Maharashtra’s Sevak’ म्हणजेच ‘महाराष्ट्राचा सेवक’ असा बदल केला आहे. या ट्विटर हँडलवरील कव्हर फोटोही बदलला असून ‘धन्यवाद महाराष्ट्र’ असा कव्हर फोटो टाकण्यात आला आहे. शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू असले तरी राज्यात महायुतीचेच सरकार येणार असा दावा भाजप नेते गिरीश बापट यांनी नुकताच केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांना आपले सरकार येणार नाही आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, याची खात्री पटल्याचे या बदलातून ध्वनित होत आहे.

हेही वाचा: मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्यच बनले राज्यातील सत्तेच्या ‘वाटाघाटी’चे केंद्र!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा