निलेश राणे- रोहित पवारांतील ‘कुक्कुटपालन’ वाद: वाचा कोंबडी चोरीचे रंजक किस्से…

0
3758
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांच्या मागणीवर केलेल्या टिकेला उत्तर देताना ‘कुक्कुटपालन उद्योगा’चा उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोंबडी आणि कोंबडीचोर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर काय आहे नेमके कोंबडीचोरीचे प्रकरण? याबाबत अनेकांना प्रचंड उत्सुकता लागलेली आहे.  माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि कोंबडीचोर याबाबत अनेक किस्से सांगितले जातात. त्यातील दोन किस्से असे…

किस्सा क्रमांक १: शिवसेना भवनाशी संबंधित एका जुन्या शिवसैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, राणेंना शिवसेनेत आणण्याचे काम पक्षाचे निष्ठावंत व ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांनी केले होते. बालपणीच्या काळात राणे त्यांचे मित्र हनुमंत परब यांच्यासोबत चेंबूर परिसरात गुंडागर्दी करत असत. बालपणीच त्यांनी मित्रांसमवेत चेंबूर परिसरात अनेकदा कोंबड्या चोरल्या होत्या. कोंबडी चोरताना पकडल्यानंतर लीलाधर डाकेंनीच त्यांना वाचवलेही होते. मात्र राणेंच्या विरोधात पोलिस ठाण्यात कोंबडी चोरीचा अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र याच किश्श्यामुळे नंतर त्यांना ‘कोंबडीचोर’ म्हणून चिडवले जाऊ लागले. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तर शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते रामदास कदम, सुभाष देसाई यांच्यापर्यंत सर्वच शिवसेना नेते त्यांना ‘कोंबडीचोर’ म्हणूनच संबोधत होते.

हेही वाचाः निलेश राणेंच्या ‘साखर’ टिकेला उत्तर देताना रोहित पवारांनी वापरला ‘कोंबडी’च्या संदर्भाचा मसाला!

किस्सा क्रमांक २: राणेंचे नाव ‘कोंबडीचोर’ असे पडण्यामागे आणखी एक किस्सा सांगितला जातो. शिवसेनेचे कार्यालय शिवालयाशी संबंधित अन्य एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, किशोरवयात राणे कोंबडीचोरीबरोबरच तंटेबखेडे करण्यातही आघाडीवर असत. तरूण झाल्यानंतर चेंबूर परिसरात त्यांची एक टोळीही सक्रीय झाली होती. या टोळीवर मारझोडीपासून ते खून आणि खूनाचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. राणे हे कोकणातील आहेत. कोकणात छोटेमोठे गुन्हे करणाऱ्या गुंडांना ‘कोंबडीचोर’ संबोधले जाते. त्यामुळे राणेंचे नावही ‘कोंबडीचोर’ असेच पडले.

हेही वाचाः कणकवलीच्या ‘कोंबडी’ला बारामतीचा ‘मसाला’: रोहित पवार- राणे वादात चर्चेची खमंग ‘कंटकी’!

कधीकाळी बाळासाहेब ठाकरेंचे ‘खास’ होते राणेः कधीकाळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत ‘खास’ आणि विश्वासू राहिलेल्या राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच शिवसैनिक ‘कोंबडीचोर’ म्हणूनच राणेंची खिल्ली उडवत होते. २०१५ मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक मैदानात उतरलेल्या राणेंचा शिवसेनेच्या तृप्ती देसाई यांनी पराभव केला. तेव्हाही शिवसैनिकांनी हातात ‘कोंबड्या’ घेऊन विजयाचा जल्लोष केला होता आणि ‘हारला रे हारला, कोंबडीचोर हारला’ अशी घोषणाबाजीही केली होती. दैनिक भास्करने १६ एप्रिल २०१५ रोजी हे वृत्त दिले होते. माजी खासदार निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात कुक्कुटपालनावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर  राजकारणाच्या फडात ‘कोंबडी’ची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या वृत्ताचा अनुवाद येथे दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा