कणकवलीच्या ‘कोंबडी’ला बारामतीचा ‘मसाला’: रोहित पवार- राणे वादात चर्चेची खमंग ‘कंटकी’!

0
4156
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साखर उद्योगाला मदत करण्याच्या मागणीवर टीका करणारे माजी खासदार निलेश राणे यांना उत्तर देताना कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कणकवलीच्या ‘कोंबडी’ला बारामतीचा  खास ‘मसाला’ मारल्यामुळे दोन दिवसांपासून राजकारणाच्या फडात चर्चेची खमंग ‘कंटकी’ पकलेली पहायला मिळत आहे. रोहित पवारांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना मी ‘साखरेवर बोललो, पवार साहेबांवर नाही’ असे सांगणाऱ्या निलेश राणेंना ‘ रोहित पवार कुक्कुटपालनावर बोलले, कोंबडीचोर बोलले का?’ असा खोचक सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

लॉकडाऊनमुळे साखर उद्योग अडचणीत आला असून हा उद्योग वाचवा आणि भरीव आर्थिक मदत द्या, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. पवारांच्या या मागणीवर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली होती. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँक सगळे साखर व्यवसायाला वर्षोंवर्ष साथ देत आलेत, तरी वाचवा? असा सवाल राणेंनी केला होता. राणेंच्या या टीकेला उत्तर देताना रोहित पवारांनी ‘साहेबांनी कुक्कुटपालन उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र लिहून उपाययोजना सूचवल्या आहेत… काळजी नसावी’ अशी सौम्य पण खोचक मेख मारली होती.

हेही वाचाः निलेश राणेंच्या ‘साखर’ टिकेला उत्तर देताना रोहित पवारांनी वापरला ‘कोंबडी’च्या संदर्भाचा मसाला!

रोहित पवारांनी त्यांच्या उत्तरात ‘कुक्कुटपालन उद्योगा’चा उल्लेख केल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर अचानक कोंबडी चांगलीच चर्चेत आली आहे. राणेंचा आणि कोंबडीचा संबंध कुणाला माहीत आहे का?  या विचारणेपासून राजकारणाच्या फडात सुरू झालेली चर्चा चांगलीच रंगात आली असतानाच निलेश राणेंनी रोहित पवारांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना पातळी सोडून भाषा वापरली. ‘मी साखरेवर बोललो, पवार साहेबांवर नाही… मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक टाकू नकोस. नाही तर साखर कारखान्यासाखी हालत होईल तुझी’  असे ट्विट निलेश राणेंनी केले. त्यावरही ‘ रोहित पवार कुक्कुटपालनावर बोलले, कोंबडीचोरीवर बोलले का?  असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला.

एकूणच या वादात कणकवलीच्या ‘कोंबडी’ला बारामातीच्या ‘मसाल्या’ची फोडणी अशी बसली की रोहित पवार आणि निलेश राणे समर्थक एकमेकांवर जोरदार टिकास्त्र सोडत आहेत. कुक्कुटपालन आणि कोंबडीचोर हे दोन विषय वेगवेगळे आहेत, सर्वांनी नोंद घ्यावी, म्हणत काहींना या चर्चेला तडका मारण्याचाही प्रयत्न केला आहे. कुक्कुटपालन हा  एक उत्तम शेतीपुरक व्यवसाय आहे. कारण कोरोनामुळे कुक्कुटपालन व्यवसाय अचडणीत आल्याने काही ‘कुक्कुट’ स्वतःच्या अडगळीत पडलेल्या ‘कुक्कुट चोरीच्या’ व्यवसायाकडे परत वळायच्या तयारीत आहे, असं विश्वसनीय सूत्रांनी ‘कुक्कुट’सोबत बोलल्यानंतर सांगितले’, असे ट्विट आशिष मेटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा