विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी वसतिगृहांचे होणार ‘मातोश्री’ असे नामांतर!

0
84
छायाचित्र सौजन्यः twitter/@samant_uday

नागपूरः राज्यातील सर्व विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी वसतिगृहांना ‘मातोश्री’ असे देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या वसतिगृहांचेही ‘मातोश्री’ असे नामांतर केले जाणार आहे.

रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील ‘मातोश्री छात्रावास’ या विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व विद्यापीठ परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहांचे ‘मातोश्री’ असे नामांतर करण्याची शक्यता मी पडताळून पहात आहे. ही वसतिगृहे विद्यार्थ्यांना त्यांच्या आईसमान आश्रय देतात. त्यामुळे सर्वच विद्यापीठातील सर्वच वसतिगृहांना ‘मातोश्री’ असे नाव देता येईल का, अशी शक्यता मी पडताळून पहात आहे, असे उदय सामंत म्हणाले.

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे उपनगरात असलेल्या निवासस्थानाचे नावही ‘मातोश्री’ आहे. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या विद्यार्थिनी वसतिगृहाला ‘मातोश्री’ असे नाव दिले आहे.

महाराष्ट्रात सध्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. औरंगाबाद, पुणे, उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा मुद्दा भाजपने उकरून काढून शिवसेनेला कोंडित पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच आता उदय सामंत यांनी आता वसतिगृहांच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेली विद्यापीठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून ऑफलाइन शिक्षणासाठी उघडली जाणार आहेत. ५० टक्के विद्यार्थी क्षमतेसह महाविद्यालये उघडली जातील. या वर्षी ७५ टक्के उपस्थितीची अटही  रद्द करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा