मोदींना पत्र लिहून काश्मीर मुद्यावर लक्ष वेधले, वर्ध्याच्या विद्यापीठातून सहा विद्यार्थी निलंबित

0
132
संग्रहित छायाचित्र.

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील सद्यस्थिती आणि काश्मीर प्रश्नावर लक्ष वेधणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने निलंबित केले आहे. मोदींना पत्र लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केला, असे कारण विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे. देशातील झुंडबळीच्या विरोधात मोदींना पत्र लिहून कठोर कायद्याची मागणी केल्यामुळे 50 सेलिब्रेटिंविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच वर्ध्यात हा प्रकार घडला आहे.

निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांत सामाजिक कार्य विषयात एम. फिल. करणारा चंदन सरोज, पीएचडी आणि शांतता विषयाचा संशोधक छात्र नीरज कुमार, महिला अध्ययन विषयाचे राजेश सारथी आणि रजनीश आंबेडकरएम. फिल करणारा पंकज वेला आणि पदविका अभ्यासक्रमाचा विद्यार्थी वैभव पिंपळकर यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्रात शिकत आहेत. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात बसपाचे संस्थापक कांशीराम यांची जयंती साजरी करण्याची विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. परंतु विद्यापीठाने ती नाकारली. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी येऊन निदर्शने केली होती. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहात सामूहिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. विद्यापीठात सर्व कार्यक्रमांना परवानगी मिळते. मग कांशीराम यांच्या जयंतीसाठी परवानगी का नाकारण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत निषेध नोंदवला होता.

विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचीव डॉ. राजेश्वर सिंह यांनी या सहा विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आणि न्यायलयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा ठपका या विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे. ही कारवाई बेकायदेशीर आहे. विद्यमान स्थितीवर चिंता व्यक्त करीत पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची बाब गुन्हा ठरू शकत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने कार्यक्रमास परवानगी मागितली होती, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा