जयंती विशेषः महात्मा फुलेकृत ‘तृतीय रत्न’ नाटकातील सामाजिक स्तरभेदाचे चित्रण

0
77

‘शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे’, या सिद्धांतावर जोतीरावांचा पूर्ण विश्वास होता. त्याचबरोबर दलाली आणि मक्तेदारीविरुद्ध बंडखोरी ही त्यांची निष्ठा होती. या कार्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपली वाणी, लेखणी वापरली. प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला प्रेरणा दिली. मानव्याची आच निर्माण करण्यासाठी माणूस प्रथम जागा केला पाहिजे, या जाणिवेने फुल्यांनी साहित्य निर्माण केले. त्या साहित्य प्रकारात त्यांनी नाटक हा प्रकारसुद्धा वापरला. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे नाव ‘तृतीय रत्न’!

  • प्रा.सिद्धार्थ तायडे (लेखक औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात संशोधक आहेत.)

स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय आणि लोकशाही ही मूल्ये दलित साहित्याचा मूलाधार आहेत. हिंदू समाजव्यवस्थेमध्ये जातीची उतरंड आहे. त्यामुळे उच्च जात व कनिष्ठ जात अशी विषमता असून ‘दलितत्व’ हे या विषमतेचे अपत्य आहे. दलितांवर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. त्याला विरोध करण्यासाठी साहित्यकलेला दलितांनी त्यांच्याविरुद्ध लढण्याचे एक हत्यार बनवले आहे. त्यामुळे या विषमतेविरुद्ध लेखन करून लढा देणे ही दलित लेखकांची जबाबदारी आहे, असे हा साहित्यप्रवाह मानतो. शत्रूंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार हे फार मोठे शस्त्र आहे. ही इतिहासाची साक्ष असून महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही रक्तपातविरहित समाज परिवर्तनासाठी शब्दशस्त्रांचाच वापर करून आपल्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. महात्मा फुले यांनी त्याच शब्दसामर्थ्याची जाणीव ठेवून समाजप्रबोधनासाठी लेखनमाध्यम उपयुक्त असल्याचे दलित साहित्यिकांना सांगितले. त्याचप्रमाणे स्वतःही लेखन केले. दलित जाणिवा मांडून त्यांनी मोलाचे काम केले आहे.

दलितांच्या व्यथा, वेदना प्रस्थापित जोपर्यंत समजून घेत नाहीत तोपर्यंत  चळवळीच्या नाटकांची अभिव्यक्ती ही विद्रोहीच राहणार. उदा.तृतीय रत्न, युगयात्रा, किरवंत,  वाटा पळवाटा, तनमाजोरी, कैफियत,  देवनवरी, साक्षीपुरम, बामनवाडा, काळोखाच्या गर्भात,  कोण म्हणतं टक्का दिला,  थांबा रामराज्य येतय इत्यादी. तेव्हा दलित चळवळीची, फुले-आंबेडकरी विचारांची नाटके म्हणजे मूल्यवाचक, मूल्याधिष्ठित संकल्पना व जीवनपद्धती स्वीकारणारी साहित्यकृती होय, असे निश्चितपणे म्हणता येऊ शकते. दलित नाटकांचा वेगळा प्रवाह, मानवी जीवनविषयक मूल्ये परिवर्तनशील समाजाला परावर्तित विचारांची, शोषणविरहित समाजजीवनाचा, समतेचा प्रवाह बलदंड करणारा;  मूल्याधिष्ठित विचारप्रणाली स्वीकारून वेगळे अस्तित्व असलेला असा हा मूलतःच वेगळा वाड्.मयप्रकार आहे. समाजक्रांतीचे जनक मराठीचे आद्य नाटककार महात्मा ज्योतिराव फुले हेच दलित नाट्य चळवळीचेही प्रेरणा स्थान होत. म्हणजेच दलित रंगभूमीवरील नाट्य चळवळीचा उगम महात्मा फुले यांच्या तृतीय रत्न(इ .स.१८५५ ) या नाटकामध्येच सापडतो. त्यांनी स्वतंत्र व वास्तवपूर्ण कथानकाचा आश्रय घेऊन धर्माच्या नावाखाली चालणारे शोषण या नाटकात दाखवून दिले आहे. हा दलित नाटकांचा पहिला महत्वपूर्ण टप्पा होय.

पार्श्वभूमी तृतीय रत्न या नाटकाचा सारा इतिहासच मुळी नाट्यपूर्ण आहे. पण हे नाटक प्रत्यक्ष लिहिण्यापूर्वी जोतिराव फुल्यांची जडणघडण कशी होत होती हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. १८४१ ते ४७ या काळात जोतिरावांचे माध्यमिक शिक्षण इंग्रजी मिशनरी शाळेत झाले होते. १८४७ मध्ये टॉमस पेनच्या ‘राइट्स ऑफ मॅन’ या क्रांतिकारक ग्रंथाचे त्यांचे वाचन झाले होते. १८५४ मध्ये त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली होती. थोडक्यात जोतिराव फुल्यांची कार्याची दिशा अस्पष्टशी का होईना तयार झाली होती. १८४८ मध्ये त्यांनी शूद्रातिशूद्र मुलींसाठी शाळा काढली. तेव्हा जोतिबांचे वय अवघे २१ वर्षांचे होते आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी नाटक लिहिले ‘तृतीय रत्न’. त्यावेळी त्यांच्या स्वतंत्र विचारांची सिद्धता झाली होती आणि नाटक या माध्यमामधून आपले विचार समाजासमोर मांडू शकू याची खात्रीही त्यांना वाटत होती. तृतीय रत्न नाटक लिहिण्याचा आपला हेतू जोतिरावांनीच एके ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेला आहे. जोतिराव लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या नि:पक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून सन १८५५ सालात दक्षिणा प्राइझ कमिटीला अर्पण केले.

तृतीय रत्नमधील सामाजिक स्तरभेदाचे चित्रण
” विद्येविना मती गेली।+
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
हे अनर्थ दूर करण्यासाठी जोतिराव फुल्यांनी व्रत घेतले शूद्रातिशूद्रांना शिक्षण देण्याचे! ‘शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे’, या सिद्धांतावर जोतीरावांचा पूर्ण विश्वास होता. त्याचबरोबर दलाली आणि मक्तेदारीविरुद्ध बंडखोरी ही त्यांची निष्ठा होती. या कार्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपली वाणी, लेखणी वापरली. प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला प्रेरणा दिली. मानव्याची आच निर्माण करण्यासाठी माणूस प्रथम जागा केला पाहिजे, या जाणिवेने फुल्यांनी साहित्य निर्माण केले. त्या साहित्य प्रकारात त्यांनी नाटक हा प्रकारसुद्धा वापरला. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे नाव ‘तृतीय रत्न’!

नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीबवर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे. हे नाटक ग्रामीण जोडप्याची कहाणी सांगते. एक शेतकरी आणि त्याची गर्भवती पत्नी स्थानिक ब्राह्मण पुजाऱ्याच्या धार्मिक फसवणुकीला बळी पडतात. पुजारी, त्याची पत्नी आणि त्याच्या नातेवाईकांच्या फसवणुकीचा सामना अत्यंत काळजीपूर्वक केला गेला आहे. नाटकातील विदुषकाच्या टिप्पण्याही तीव्र आहेत. या नाटकाचा निष्कर्ष असा आहे की, अशिक्षित आणि मागासवर्गीय ग्रामस्थांकडे शोषणापासून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे – शिक्षण. नाटकाच्या शेवटी, शेतकरी आणि त्याची पत्नी फुले दाम्पत्याच्या रात्रीच्या शाळेत प्रवेश घेण्याचा आणि आपल्या भावी पिढीसाठी नवीन भविष्य घडविण्याचा निर्णय घेतात.

उत्सुकता निर्माण करणार्‍या या नाटकाविषयीची एक गोष्ट म्हणजे ख्रिश्चन पुरोहिताची उपस्थिती. नाटकाच्या उत्तरार्धात, फुले नाटकाचे मुख्य पात्र म्हणून अज्ञात पुजाऱ्याची ओळख करून देत आहेत. पाद्री या “निम्न जातीच्या” जोडप्याचे तिसरे रत्न (तृतीय डोळा किंवा शहाणपण) उघडण्यासाठी पुढाकार घेतात. तिसरा रत्न गंभीर आणि तार्किक विचारांचा आहे. जो सामाजिकदृष्ट्या वर्चस्व असलेल्या वर्गाच्या भीतीपासून मुक्त आहे. हे रत्न केवळ साक्षरता नसून, वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता नसून आयुष्य समजून घेण्याची क्षमता आणि त्या जीवनाद्वारे प्रदान केलेल्या संधी जे कोणत्याही प्रकारच्या दबाव किंवा फसवणकीपासून स्वतंत्र आहेत. हा रत्न, हा तिसरा डोळा शहाणपणाच्या फुलासारखा आहे. ज्याला अनेक युगांपासून पौराणिक कथांमध्ये आणि अंधश्रद्धेने चिकटविले गेले आहे. सन्माननीय मानवाच्या सन्माननीय अस्तित्वासाठी ती अत्यावश्यक जीवनरेखा आहे. आपण शिक्षित नसल्यास आपण सहजपणे शोषणाचे बळी बनू शकता. म्हणून शिक्षित व्हा आणि शोषण टाळा. परंतु फुले एका पास्टरला वैयक्तिक आणि सामाजिक प्रबोधनासाठी उत्प्रेरक बनवून ऐतिहासिक सत्य अधोरेखित करीत होते. तो एका सामाजिक सत्याचे दस्तऐवजीकरण करीत होता. फुले स्वत: स्कॉटिश मिशनरी शाळेत शिकले. हे शक्य आहे की जेव्हा मरे मिशेल सारख्या प्रेरणादायी, कष्टकरी आणि समर्पित शिक्षकांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांची स्वतःची गंभीर विवक्षितता विकसित झाली आणि भारताच्या जातीव्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्याचे त्याचे धैर्य आणखी दृढ झाले.

इंग्रजी राज्य शेटजी-भटजींच्या सहकार्यावर अवलंबून आहे, हे फुले यांना स्पष्ट माहिती होते. आणि या वर्गाला चिडवून ते आपल्या सरकारला धोका पत्करू शकत नाहीत. ब्रिटीश राज्यकर्ते ‘खालच्या जाती’च्या हितासाठी काम करतात असे दिसत नाही. महाराष्ट्रातील उपेक्षित शुद्रातिशुद्राच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करणारी एकमेव सामाजिक शक्ती ख्रिश्चन मिशनरी असल्याचेही फुले यांनी नमूद केले. असे म्हटले जाऊ शकते की, फुले यांचे नाटक केवळ देशातील उच्चवर्गाच्या दुर्लक्ष आणि शोषणाचा बळी पडलेल्या भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी संघर्ष नाही तर ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या निःस्वार्थ नायकांच्या परिश्रमांसाठीही कृतज्ञता आहे. ज्यामुळे भारतीय समाज पाहण्याची अनोखी दृष्टी प्राप्त होते.

नाटकाचे स्वरूप या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत.

नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामध्ये खंड पडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठराविक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचिक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.

या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा तृतीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतीरावांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिरावांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.

हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखवणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.

भारतीय सामाजिक व्यवस्था चार वर्णांवर आधारित आहे. जाती प्रणाली हे या व्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य. शुद्रातिशुद्र समाज जातीभेदांसह अस्पृश्यतेसारख्या आजारांनी ग्रस्त होता. परंतु शोषक वर्गासाठी ही व्यवस्था म्हणजे देवाची, धर्माची आज्ञा होती. शुद्रातिशुद्र होण्याचा अर्थ म्हणजे त्यांच्या पूर्वीच्या जन्माची पापे आणि हे पाप भोगायला देव आहे. म्हणूनच शुद्रातिशुद्राचे शोषण, त्याचा छळ धार्मिक, दिव्य मानला जात असे. अभिजनवर्गाला ‘शोषक’ म्हणून या समस्येचे शोषण करण्याचे कारण नव्हते. परंतु देव आणि धर्मातील हे ढोंगी कवच ​​नष्ट करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. चातुर्वर्ण, जातीभेद, अस्पृश्यता इत्यादी परंपरेचा निषेध म्हणून त्यांनी सर्जनशील बंड केले. त्यांनी शिक्षणाची गरज, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाहिरात, सामाजिक समतेसाठी संघर्ष आणि शुद्रातिशुद्रांची जनजागृती केली. ‘अज्ञाना’तल्या या अज्ञानाच्या मुळ्यांमुळे त्यांनी’ शिक्षणा’ला आपले हत्यार बनवले. ‘शिक्षण’ हा माणसाचा ‘तिसरा डोळा’ आहे. हा मंत्र त्यांनी पीडित-शोषित समाजाला दिला. ‘तृतीय रत्न’ या नाटकात मागासलेल्या समाजाला शिक्षण देण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा