भाजप नेत्या विजया रहाटकर अडचणीत, ‘प्रज्वला’ योजनेतील घोटाळ्याची होणार उच्चस्तरीय चौकशी

0
462
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजप नेत्या विजया रहाटकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या ‘प्रज्वला’ योजनेच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाईल. या चौकशी समितीसमोर राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनाही हजर रहावे लागेल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानपरिषदेत दिली. त्यामुळे विजया रहाटकर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी प्रज्वला योजनेच्या निधीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे सोमवारी विधान परिषदेत मांडला. त्यावर उत्तर देताना ॲड. ठाकूर यांनी ही घोषणा केली. २०१४ ते २०१९ या काळात औरंगाबादच्या भाजप नेत्या विजया रहाटकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. राज्य महिला आयोगामार्फत ‘प्रज्वला’ या नावाने महिला सक्षमीकरणासाठी सर्व महिला बचत गटातील महिलांकरिता जून २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘प्रज्वला’ योजनेतील गैरव्यवहाराची माहिती देताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, ही योजना राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात लागू करण्यात येणार होती. परंतु प्रत्यक्षात ती राज्यातील निवडक ९८ मतदारसंघांमध्येच लागू करण्यात आली. या योजनेचा लाभ भाजपलाच मिळावा, अशा पद्धतीने या निवडक विधानसभा मतदारसंघांची निवड करण्यात आली होती.

राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेली प्रज्वला योजनेची बिले हस्तलिखित असून ती अंतिम नाहीत. जी बिले सादर करण्यात आली आहेत, ती मार्गदर्शक तत्वांनुसार योग्य स्वरुपात नाहीत, असा आक्षेप मनीषा कायंदे यांनी घेतला आणि प्रज्वला योजनेच्या निधीतील गैरव्यवहाराची उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तर देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, प्रज्वला योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या निधीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करेल. या चौकशी समितीसमोर राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनाही हजर राहावे लागेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

राज्य महिला आयोगामार्फत ‘प्रज्वला’ या नावाने महिला सक्षमीकरणासाठी सर्व महिला बचत गटातील महिलांकरिता जून, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत स्त्रियांच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे व सल्ला देणे या आयोगाच्या महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याकरिता महिला बचत गट प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. मात्र या योजनेतील निधीचा गैरवापर झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाईल, असेही मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पीडित महिलांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरित्या संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे या गोष्टीशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचेही ठाकूर म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा