विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या यादीत खडसे, शेट्टी, सावंत आणि ही अन्य नावे…

0
3218
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विधान परिषदेवर पाठवायच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी घेऊन महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेले आहे.त्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. काल अंतिम करण्यात आलेल्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर काँग्रेसने सचिन सावंत, रजनी पाटील यांच्या आणि शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

 सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक या तीन मंत्र्यांचे शिष्टमंडळ या १२ सदस्यांची यादी घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले आणि त्यांनी ही यादी त्यांच्याकडे सुपूर्द केली. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावावरून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा घोळ सुरु आहे. अखेर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि आज ही महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुपूर्द केली. आता राज्यपाल या यादीला मंजुरी देतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचाः शाळांना आता पाचऐवजी १४ दिवसांच्या दिवाळी सुट्या, शिक्षण विभागाने फिरवला आधीचा निर्णय

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी चार नावे अंतिम केली आहेत. ती अशीः

काँग्रेसः

 • सचिन सावंत
 • रजनी पाटील
 • मुझफ्फर हुसैन
 • अनिरुद्ध वनकर

 राष्ट्रवादी काँग्रेसः

 • एकनाथ खडसे
 • राजू शेट्टी
 • यशपाल भिंगे
 • आनंद शिंदे
  शिवसेनाः
 • उर्मिला मातोंडकर
 • नितीन बानगुडे पाटील
 • चंद्रकांत रघुवंशी
 • विजय करंजकर

यशपाल भिंगेंमुळे झाला होता अशोक चव्हाणांचा पराभवः राष्ट्रवादीकडून शिफारस केलेले यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसने शिफारस केलेले अनिरुद्ध वनकर यांनीही चंद्रपूरमधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा