शक्य होईल तितक्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढवणारः महसूलमंत्री थोरात

0
212
छायाचित्रः twitter/@bb_thorat

संगमनेरः महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वबळाचे नारे देऊ लागल्यामुळे या आघाडीत ‘महाबिघाडी’ होईल, असे अंदाज बांधले जात असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र एकोप्यानेच राहण्याच्या मनःस्थितीत दिसत आहेत. शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रच लढवणार आहोत, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. थोरातांच्या या वक्तव्यामुळे आघाडीत ‘बिघाडी’ची स्वप्ने पाहणारांचा चांगलाच मुखभंग होण्याची शक्यता आहे.

 अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी हे वक्तव्य केले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आपआपले पक्ष वाढवण्याची गरज आहे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. यात काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला, असे मला कुठेही दिसत नाही. शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रच लढवणार आहोत, असे थोरात म्हणाले.

फडणवीस फक्त घोषणाच करतातः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाष्य केले होते. त्यावरून थोरात यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. मी पुन्हा येईन अशी घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस फक्त घोषणा करत असतात. त्या घोषणा प्रत्यक्षात खऱ्या होत नाहीत. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. आमचे सरकार आणखी तीन वर्षे चालेल. एवढेच नाही तर राज्यात निवडणुका झाल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार आले तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये, असे थोरात म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाचः शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपदावर दावा केलेला नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचाच राहणार आहे, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. राज्यात सरकार दरवर्षी झाडे लावण्यास सुरूवात करते, परंतु सध्या वनमंत्रिपदच रिक्त आहे, या प्रश्नावर थोरात म्हणाले की, वनमंत्रिपद रिक्त नाही. हे पद मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे काम जोमाने होईल. परंतु दरवर्षी सरकारच झाडे लावण्याची घोषणा करेल, ही पद्धत आता बदलली पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा