पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग, आगीवर नियंत्रणाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

0
181

पुणेः जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या आणि कोरोनावरील कोविशील्ड लसीच्या उत्पादनामुळे चर्चेत आलेल्या पुण्याच्या सीरम इन्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. बीसीजी लस तयार करणाऱ्या प्लान्टमध्ये तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. इमारतीत अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे. कोरोना लसीचा प्लांट सुरक्षित असल्याचे सीरमच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या मांजरी परिसरात सीरम इन्टिट्यूट आहे. टर्मिनल १ गेटवर असलेल्या बीसीजीच्या प्लांटला आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली. या इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली, तेथे कोणतेही काम सुरू नाही. फक्त इन्स्टॉलेशनचे काम सुरू होते. त्यामुळे बीसीजी लसीला कोणताही धोका नसल्याचे सीरमने म्हटले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी आग लागलेली आहे, तेथून कोविशील्ड ही कोरोनावरील लस तयार करणारा प्लांट काही अंतरावर आहे. आगीची झळ अद्याप तरी तिथपर्यंत पोहोचलेली नाही.

ज्या इमारतीला आग लागली आहे, ती पाच मजली आहे. पाचपैकी तीन मजल्यांवर ही आग पसरली आहे. इमारतीतून निघणाऱ्या धुराचे प्रमाण खूपच जास्त आहे. धूर कमी होत नाही, तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे, असे अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी म्हटले आहे.

कोविशील्ड लसीमुळे सीरम इन्टिट्यूट देशातील अतिसंवेदनशील आणि महत्वाच्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी आगीची ही घटना गांभीर्याने घेतली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की अन्य कारणांमुळे लागली आहे, याचा शोध गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा