वेळ पडल्यास तलवार उपसूः संभाजीराजेंचा इशारा; कुणाविरोधात उपसणार?: वडेट्टीवारांचा थेट सवाल

0
772
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. मराठा आरक्षणासाठी वेळ पडल्यास तलवारीही काढू, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी आज तुळजापुरात दिला असून राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो. तलवार कोणाच्या विरोधात उपसणार?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मराठा समाज आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोकमोर्चाने मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आज तुळजापुरातून सुरूवात केली. या कार्यक्रमात बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. गरज पडेल तेव्हा तलवारीही काढू. आम्ही भीक मागत नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरू नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. त्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे थेट नाव न घेता राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो. तलवार कुणाविरोधात उपसणार? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार रूजवले. मग हे राजकारण कशासाठी?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसी आणि दलितांविरोधात तलवारींची भाषा कशासाठी?, असा सवालही वडेट्टीवारांनी केला आहे. तलवारीची नव्हे तर तडजोडीची भाषा असली पाहिजे. एमपीएससी परीक्षेत २०० जागा आहेत. त्यात २३ जागा मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय, जात, लग्नाचे प्रश्न आहेत. त्यामुळे परीक्षा झालीच पाहिजे, अशी माझी भूमिका असून कोणत्याही समाजाचे नुकसान होता कामा नये. मध्यम मार्ग काढता येतो, असेही वडेट्टीवार म्हणाले.

 भरतीच्या आड येऊ नकाः भुजबळांचीही भूमिका- रविवारी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेची केंद्रे फोडण्याचा इशारा मराठा क्रांतीमोर्चाने दिल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या परीक्षेबाबत आपली भूमिका मांडली आहे. मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. त्यांनी एमपीएससी परीक्षेला विरोध करू नये. सरकारने मराठा समाजासाठी १३ टक्के जागा ठेवल्या आहेत. आम्हाला नाही तर कुणालाच नाही, अशी भूमिका मराठा समाज व संघटनांनी घेऊ नये. भरतीमुळे आदिवासी, ओबीसी, दलित घरांतील मुलांना रोजगार मिळून त्यांच्या परिवाराचे भले होईल. भरती रद्द केल्यास अनेक तरूणांचे वय निघून जाईल, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा