जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या सभेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

0
62

औरंगाबादः मराठा समाजाच्या मागण्यांकडे महाविकास आघाडीचे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज औरंगाबादेत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभेत घोषणाबाजी करत राडा केला. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढले.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी जयंत पाटील औरंगाबादेत आले होते. सुरूवातीला कार्यकर्ते सभागृहाबाहेर घोषणाबाजी करत होते. मात्र जयंत पाटील सभागृहात आल्यानंतर काही कार्यकर्ते थेट सभागृहात घुसले आणि त्यांनी  घोषणाबाजी केली. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करा,  सारथी संस्थेला २०० रुपये निधी द्या, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधकामासाठी प्रत्येक जिल्ह्याला ५ कोटी रुपये द्या, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी केल्या. जयंत पाटलांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे न ऐकता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाहेर काढले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा