…मग ‘फुलप्रूफ’ कायदा कोर्टात का टिकला नाही?: मराठा आरक्षणावर चव्हाणांचा फडणवीसांना सवाल

0
239
संग्रहित छायाचित्र.

मुंबई मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ आहे. या कायद्याला कोणताही अडथळा येणार नाही, असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते. मग हा कायदा इतका फुलप्रूफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही? असा सवाल  मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांना केला.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी फुलप्रुफ कायदा आणू म्हणून सांगितले होते. या कायद्यामुळे काहीच अडचण येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. तुमचा कायदा एवढाच फुलप्रूफ होता तर सर्वोच्च न्यायालयात तो का टिकला नाही?, असा सवाल करतानाच आम्ही तर तुम्ही आणलेला आरक्षण कायदा मान्य केला. त्यावर चर्चाही केली नाही आणि आक्षेपही घेतला नव्हता, याकडे चव्हाण यांनी विरोधकांचे लक्ष वेधले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेलेच वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. एकूण नऊ ते दहा निष्णात वकील हा खटला लढवत आहेत. पण काही ना काही मुद्यांवर विषय अडत आहे. पण आम्हीही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आता या प्रकरणावर कोर्टात दररोज सुनावणी होणार असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार चव्हाण यांनी बोलून दाखवला.

गोबेल्स नीतीमधून काय साधणार?: सरकार कुणाचे आहे हे महत्त्वाचे नाही. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कंबर कसली पाहिजे. आजच्या परिस्थितीत काय केले पाहिजे याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे, असे सांगतानाच काही लोक मात्र गोबेल्स नीती वापरुन मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत गोबेल्स नीतीमधून काय साध्य करायचंय? असा सवालही  चव्हाण यांनी केला.

ओबीसीविरूध्द सरकार अशी का भांडणे लावता?: ओबीसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावणार, तशी सरकारचीही भूमिका नाही. असे कोणीही वक्तव्य केलेले नाही. असे असताना मग सरकारच्या नावाने का ओरडता? ओबीसीविरूध्द सरकार अशी का भांडणे लावता? असे  सवाल करत हा राजकारणाचा विषय नाही. पण विधानपरिषद निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने ते अशी भांडणे लावत आहेत, असा टोला चव्हाण यांनी विरोधकांना लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा