मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीवर घटनापीठापुढे ९ डिसेंबरला सुनावणी

0
110
संग्रहित छायाचित्र.

मुंबई  मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याबाबत राज्य  सरकारने केलेल्या अर्जावर येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी  ट्विट करून दिली. या निर्णयाने राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्यात यावा अशी विनंती राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याची विनंती सरन्यायाधीशांना करण्यात आली होती. राज्य सरकारने यापूर्वी ७ ऑक्टोबर,२८ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी घटनापीठ स्थापन करण्यासाठी  सर्वोच्च न्यायालयात  अर्ज सादर केले होते.

मराठा आरक्षणाला दिलेल्या या अंतरिम स्थगितीवर सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यामुळे राज्य सरकारच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्याची विनंती  सरकारच्यावतीने घटनापीठाला करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा