आधी मला मुख्यमंत्री करा, मग प्रश्न विचाराः संभाजीराजेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

0
282
छायाचित्र सौजन्यः twitter/@YuvrajSambhaji

बीडः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत संवाद मेळावे घेत असलेल्या  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बीडच्या संवाद मेळाव्यात केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. संवाद मेळाव्यात प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून ‘आधी मला मुख्यमंत्री करा, मग प्रश्न विचारा’ असे वक्तव्य संभाजीराजे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

झाले असे की, बीडमध्ये संवाद मेळाव्यात संभाजीराजेंचे भाषण सुरू असताना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले आणि ते मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंना प्रश्न विचारू लागले. या कार्यकर्त्यांना उत्तर देताना ‘हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांना विचारा. पण ते तुम्हाला उत्तर देणार नाहीत. मला प्रश्न विचारायचा असेल तर या संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा. असे झाले तर नक्कीच बहुजनांच्या हिताचे काम केल्याशिवाय राहणार नाही,’ असे संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांच्याकडे बोट दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना संभाजीराजेंनी हे वक्तव्य केले असले तरी यानिमित्ताने त्यांच्या मनातील मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा या निमित्ताने बाहेर पडली. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची त्यांची खरेच राजकीय महत्वाकांक्षा आहे काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटना दुरूस्तीबाबत केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता ३४२अ नुसार राष्ट्रपतींकडे राज्य सरकारने शिफारस करून त्या माध्यमातून आरक्षण मिळवणे हा शिल्लक राहिलेला पर्याय आहे. त्यासाठी समाजाने एकजुटीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असेही संभाजीराजे यावेळी बोलताना म्हणाले.

आरक्षणाबरोबरच इतर मागण्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. या सर्व मागण्या मान्य होऊन त्यांची संपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहनही संभाजीराजे यांनी मराठा समाजबांधवांना केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा