मराठा आरक्षणः घटनापीठ स्थापनच झाले नाही तर मग विनोद पाटील उद्या कोणत्या पीठाकडे जाणार?

0
273
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे पुढे ढकलली आणि याचिकाकर्ते घटनापीठाकडे जाऊ शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यावर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लगेच उद्या घटनापीठाकडे जाणार असल्याचे जाहीर केले असले तरी सरन्यायाधीशांनी मराठा आरक्षणप्रश्नी अद्याप पाच न्यायमूर्तींचे घटनापीठच स्थापन केलेले नाही, तर विनोद पाटील उद्या लगेच घटनापीठाकडे कसे जाणार? हा प्रश्न उपस्थित केला जात असून या प्रश्नावर लढणाऱ्यांच्या कायदेशीर व घटनात्मक ज्ञानावरही आता प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला ९ सप्टेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली. त्यावर महाराष्ट्र सरकारने ही स्थगिती उठवण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आणि या अर्जाची सुनावणीही पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढेच घ्यावी, असा आग्रह धरला. आज झालेल्या सुनावणीत न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने आज आम्ही यावर काहीच करू शकत नाही, तुम्ही घटनापीठापुढे जा, असे सांगत या अर्जावरील सुनावणी चार आठवडे  पुढे ढकलली.

 सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपण लगेच उद्या घटनापीठाकडे जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र विशेष बाब म्हणजे ९ सप्टेंबरला न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवले होते. परंतु सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अजूनही या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी घटनापीठच स्थापन केलेले नाही. तर विनोद पाटील उद्या लगेच कुठल्या घटनापीठासमोर जाणार असा मूळ प्रश्न कायद्याचे जाणकार उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न भावनिक न करता कायदेशीर तथ्यांच्या आधारावर लढण्याची गरज आहे, असेही या जाणकारांचे मत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा