मराठा आरक्षणः संभाजीराजेही बोलू लागले प्रकाश आंबेडकरांची ७०:३० टक्क्यांची थिअरी!

0
1030
संग्रहित छायाचित्र.

न्यूजटाऊन विशेष/ औरंगाबादः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आणि याबाबत केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विलोकन याचिकाही फेटाळून लावली असली तरीही मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापणे काही थांबायला तयार नाही. अशातच संवाद मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे करत असलेले खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेत अचानक आज लक्षणीय बदल झाल्याचे दिसून आले. ३० टक्के सधन मराठ्यांमुळे ७० टक्के गरीब मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच स्पष्टपणे मांडली होती. आता तिच थिअरी खा. संभाजीराजे छत्रपतीही मांडू लागले आहेत.

औरंगाबादेत आयोजित संवाद मेळाव्यात खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेत हा लक्षणीय बदल दिसून आला. ३० टक्के सधन मराठ्यांमुळे ७० टक्के गरीब मराठ्यांना आरक्षण नाकारण्यात आले. त्यामुळे ७० टक्के गरीबांचे नुकसान होत आहे. त्याबद्दल कुणीच बोलत नाही, अशी खंत खा. संभाजीराजे छत्रपती यांनी औरंगाबादेत बोलून दाखवली. नेमकी हीच भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच अनेकदा मांडली आहे.

हेही वाचाः ३० टक्के सधन मराठ्यांमुळे ७० टक्के गरीब मराठ्यांना आरक्षण नाकारलेः संभाजीराजे छत्रपती

प्रकाश आंबेडकरांची मराठा आरक्षण थिअरी काय?: महाराष्ट्रातील ७० टक्के मराठा समाज गरीब आहे आणि ३० टक्के मराठा समाज सधन आहे. जोपर्यंत ७० टक्के गरीब मराठा समाज ३० टक्के श्रीमंत मराठ्यांपासून स्वतःला वेगळे करत नाही आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करत नाही, तोपर्यंत या ७० टक्के गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आरक्षण हवे असेल तर ७० टक्के गरीब मराठा समाजाला स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि ओळख निर्माण करावी लागेल, अशी थिअरी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर वेळोवेळी मांडली होती.

संभाजीराजेंची थिअरीही आता त्याच मार्गानेः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती कायम आग्रही राहिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठीही ते आग्रही होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा प्रश्नच आता मिटला आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आज पहिल्यांदाच औरंगाबादेत त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी मांडलेलीच ७०:३० टक्क्यांची थिअरी मांडली. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी संभाजीराजे यांनी पुण्यात प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि मराठा आरक्षणप्रश्नावर चर्चाही केली होती. त्या भेटीतूनच संभाजीराजे ७०:३० टक्क्यांच्या थिअरीकडे वळले असावेत, असा अंदाज बांधला जात आहे. संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भविष्यात राजकीय जवळीक निर्माण होण्याचेच हे संकेत असल्याचेही मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा