मराठी ही शक्ती आणि भक्तीची भाषा, तिचे वाकडे करण्याची कोणाची हिंमत?: मुख्यमंत्री ठाकरे

0
56

मुंबईः मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. ती साधीसुधी नाही. एकेकाळी ज्या मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला की शत्रूंची पलापळ व्हायची, त्या मराठी भाषेचे वाकडे करण्याची कोणाचीही टाप नाही. त्यामुळे मराठी भाषा दिन चिंतित मनाने साजरा करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे. राज्य सरकारच्या वतीने आज विधिमंडळात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मराठीचा दिवस केविलवाणेपणे साजरा करण्याची गरज नाही. मराठीचे काय होणार याची चिंता करण्याची गरज नाही. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. डोके ठिकाणावर आहे, असे इंग्रजांना ठणकावून विचारणारी मराठीच होती. असे असताना चिंता कशाला करायची?  मराठी भाषा अभिजात होईल की नाही, हा वेगळा प्रश्न आहे. शिवाजी महाराज नसते तर मराठीचे पुरावे मागणारे जन्माला आले असते का?,  असा सवालही त्यांनी केला.

पूर्वी वासुदेव यायचे. आम्ही लहान असताना सकाळी वासुदेवांची वाणी ऐकायला यायची. परंतु नव्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहीत नाहीत. मराठी ऐकतो, मराठी बोलतो तसेच मराठी पाहिलीही गेली पाहिजे. अनेक संतांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही तरी आपल्याला तो टिकवता आले पाहिजे. मराठी भाषा दिवस एक दिवसापुरता न राहता सूपूर्ण आयुष्यच मराठी राहिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा