फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना हिंदुत्ववाद्यांच्या धमक्या

0
164

औरंगाबादः उस्मानाबाद येथे जानेवारीमध्ये होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना खवळल्या असून फादर दिब्रिटो हे कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू असल्याने त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केलेली निवड मागे घ्या, यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना फोन करून धमक्या देण्यात येत आहेत. स्वतः ठाले-पाटील यांनीच बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची केलेली निवड मागे घेता येत नसेल तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड कशी काय मागे घेता येईल?, असा सवाल करत ठाले-पाटील यांनी फादर दिब्रिटो यांच्या निवडीवर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ठाम असल्याचे सांगितले.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या याच योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांची उस्मानाबाद येथील नियोजित 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली. मात्र ही निवड हिंदुत्ववादी संघटनांच्या पचनी पडलेली नाही. आता त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करा म्हणून महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना मंगळवारी जवळपास शंभर धमक्यांचे फोन आले. फादर दिब्रिटो अध्यक्षपदी कायम राहिले तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशी भाषा फोन करणारे वापरत असल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी धास्तावले आहेत. फादर दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये ब्राह्मण महासंघ आणि विश्‍व हिंदू परिषदेचाही समावेश आहे.

ठाले-पाटील म्हणाले की, मी प्रत्येकाच्या मतांचा आदर करतो. प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. आपल्या भूमिकेनुसार जगण्याचा, वागण्याचा आणि करण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बदल करता येतो का? अनेक लोकांना आवडत नाही म्हणून एकदा निवडलेला मुख्यमंत्री, पंतप्रधान, आमदार, खासदार बदलता येईल का? ते जर बदलता येत नसतील तर एकदा निवडलेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा बदलता येईल?, असा सवाल ठाले-पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा : ‘गाय महत्वाची की माणूस?’ असा सवाल करणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो मराठी साहित्य महामंडळाला पेलतील का?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची पत्रकार परिषद.

दरम्यान, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून काही हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षालाच फोन करून धमक्या देत असताना राज्य सरकारकडून याप्रकरणाची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्रथमच ख्रिश्चन साहित्यिकाला मिळाला आहे. हा सामाजिक समतेचा योग्य संदेश असल्याचे सांगत साहित्यिक आणि पुरोगामी संघटनांनी महामंडळाला पाठिंबा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा