मराठवाड्याच्या सर्वांगीण‍ मनभेद व मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची गरजः राजेश टोपे

0
29

जालना: महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग हा अविकसित समजला जातो.  आपला मराठवाडा विभाग अधिक समृद्ध, सशक्त व सुशिक्षित करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मनभेद व मतभेद न बाळगता मराठवाड्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

आवश्य वाचाः सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी टोपे यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले तर पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

त्यानंतर बोलताना टोपे म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले,परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाडयात त्यावेळी पारतंत्र्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी हैद्राबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले. मराठवाडयातील थोरामोठयांनी या संग्रामात फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाडयाने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली. सर्वस्तरावर निजामाशी मुकाबला करुन, पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाडयाला  स्वातंत्र्य  मिळवून  देण्यात त्यावेळेच्या क्रांतीकारी पिढीने यशस्वी जबाबदारी पार पाडली म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळे चाखत असून या वीरांनी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी लढा दिला त्यापासुन सर्वांनी बोध घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

आजघडीला मराठवाड्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मराठवाड्याची अर्थव्यवस्था कृषी व कृषीला पुरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी, वीज, पीककर्ज पुरवठ्याबरोबरच शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याची अधिक गरज असून मराठवाड्यामध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा, तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यावण्याबरोबरच उद्योगांच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होणेही गरजेचे आहे. आपल्या मराठवाडा विभागाबरोबरच जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास अधिक जलदगतीने होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा