राज्यातील ४८८ सरकारी शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणार: प्रा. वर्षा गायकवाड

0
32

हिंगोली: राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियाना अंतर्गत प्रथम टप्प्यात मराठवाड्यातील निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये ७१८ शाळांच्या १ हजार ६२३ वर्ग खोल्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तर १०५०  शाळांची मोठी दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी एकूण २०० कोटी रुपयाची तरतूद केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ४८८ शाळांचा विकास करण्यास मान्यता दिली आहे. यात शासकीय निधी शिवाय सीएसआर निधी, लोकसहभाग आणि ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करुन शाळांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती  राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आवश्य वाचाः सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

मराठवाडा मुक्तिसंग्रामात निजामाच्या हुकुमशाही विरोधात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य आहे. स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पूर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात तसेच मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. तरीही निजाम शरण येत नसल्याचे पाहून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे आंदोलन सतत १३ महिने सुरु होते. या आंदोलनात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला, असे गायकवाड यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात निजामाच्या हुकुमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या जोखडातून मुक्त केले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. त्याची जाणीव ठेऊन मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषि विषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्याची आवश्यकता असल्याचेही प्रा. गायकवाड म्हणाल्या.

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन ८ हजार ९१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून २२ घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत दुर्दैवाने प्राण गमवावे लागलेल्या ७ लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येत आहे. यापैकी ३ मयत लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली असून उर्वरित ४ मयत लोकांच्या कुटुंबियांना मदत देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

नर्सी येथील संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्राची विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. लवकरच कामांना प्रारंभ केला जाणार असून लसीकरणासाठी जिल्ह्याला आतापर्यंत एकूण ४ लाख ९०  हजार ५६०  लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी ८८ केंद्र कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार ४ लाख ४६ हजार ४८४ लसी देण्यात आल्या असून २५ हजार ४३२ लसी उपलब्ध आहेत. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांतून सध्या हिंगोली जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. कोरोनासाठी लसीकरण सुरु झाले असले तरी अजून धोका आणखी टळलेला नाही. यासाठी आवश्यक सुचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी हिंगोली जिल्हा सज्ज आहे. हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.   

प्रारंभी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी गायकवाड यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक,  लोकप्रतिनिधी,  अधिकारी,   पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी  उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह  पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा