अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाठी गुणांची अट शिथिल; बारावीला ४५% पुरेसे

0
230
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून  सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेशपात्रता परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक होते. आता  खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत, तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत, असे सामंत म्हणाले.

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्य़ांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे.

या निर्णयामुळे सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा