बोगस जातप्रमाणपत्रः एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला १० लाखांचा दंड, पदवीही जप्त करण्याचे आदेश

0
833
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः अनुसूचित जमातीच्या (एसटी) बोगस जातप्रमाणपत्रावर एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे नांदेड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याच्या चांगलेच अंगलट आले असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने त्या विद्यार्थ्याला तब्बल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून सदर विद्यार्थ्याची एमबीबीएसची पदवीही जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या शारदा नगर भागात राहणाऱ्या आदित्य बालाजीराव रोयलावार या विद्यार्थ्याने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या बोगस जातप्रमाणपत्रावर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. आदित्यचा अनुसूचित जमाती जातीचा दावा औरंगाबादच्या अनुसूचित जमाती जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने १० डिसेंबर २०२१ रोजी फेटाळून लावला आहे. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या या निर्णयानंतर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांकडे ३० डिसेंबर २०२१ रोजी पत्र पाठवून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन मागवले होते. त्यावर वैद्यकीय शिक्षण संचालकांनी हा मोठा निर्णय दिला आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनुसूचित जमाती जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशान्वये आदित्य बालाजीराव रोयलावार यांचा एसटी प्रवर्गातील एमबीसीएसचा प्रवेश रद्द करण्यात यावा. रोयलावार यंचा एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाला असल्यास त्यांची पदवी जप्त करण्याबाबत व नोंदणी रद्द करण्याबाबत नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मुंबईच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेला आपल्यामार्फत कळवण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षण संचालकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

आदित्य बालाजीराव रोयलावार यांचा एमबीबीएस अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द केल्यामुळे शासनाची एमबीबीएस अभ्यासक्रमाची एक जागा वाया जाणार आहे. ही जागा सद्यस्थितीत भरता येणार नाही. रोयलावार यांचा प्रवेश रद्द झाल्यामुळे अनुसूचित जमातीच्या एका गुणवत्ताधारक विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे रोयलावार यांच्याकडून वैद्यकीय अभ्यासक्रमाची एक जागा वाया जात असल्यामुळे १० लाख रुपये दंड वसूल करण्यात यावा, असेही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी २० जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या कारवाईमुळे बोगस जातप्रमाणपत्रांवर आरक्षित प्रवर्गातून प्रवेश मिळवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

प्रवेश दिलाच कसा?: विज्ञान शाखेला शिकणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी इयत्ता बारावीला असतानाच केली जाते. इयत्ता बारावीचा निकाल लागेपर्यंत या विद्यार्थ्यांच्या हातात जात पडताळणी प्रमाणपत्र पडलेले असते. त्याआधारेच हे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. त्याशिवाय आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशच दिला जात नाही. असे असतानाही जर आदित्य रोयलावार या विद्यार्थ्याने बारावीला असतानाच त्याच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करून घेतलेली नसेल आणि प्रवेशाच्या वेळी त्याच्याकडे वैध जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर या विद्यार्थ्याला एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश दिलाच कसा? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा