न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमजीएममध्ये कार्यकर्त्यांचे आंदोलन, डॉ. रेखा शेळके यांनी मागितली माफी

0
725

औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी तुलना करणे एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांच्या चांगलेच अंगलट आले असून न्यूजटाऊनने या मुद्यावर प्रकाश टाकताच काही संतप्त कार्यकर्त्यांनी एमजीएममध्ये आंदोलन केले. कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर डॉ. रेखा शेळके यांनी जाहीर माफी मागितली आहे.

१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त शरद पवारांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनीही शरद पवार यांना शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांच्या फेसबूक टाइमलाइनवर केली होती. मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी शरद पवारांची तुलना थेट बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाशीच केली होती.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

‘सोशल इंजिनिअरिंगचे व्हील तुम्ही…गांधीजीची काठी तुम्ही…आंबेडकरांचे संविधान तुम्ही…. साहेब वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. असे डॉ. रेखा शेळके यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले होते. शरद पवार यांचे कर्तृत्व वादातीत असले तरी त्यांची संविधानाशी तुलना करणे गैर आहे, असे म्हणत काही आंबेडकरवादी नेटकऱ्यांनी शेळके यांच्या पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला होता.

न्यूजटाऊनने याबाबीवर प्रकाश टाकल्यानंतर काही कार्यकर्ते एमजीएम कॅम्पसमध्ये पोहोचले. त्यांनी एमजीएमचे विश्वस्त अंकुशकुमार कदम यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता डॉ. शेळके यांनी जाहीर माफी मागितली आहे.

हेही वाचाः शरद पवारांची थेट बाबासाहेबांच्या संविधानाशी तुलना, एमजीएम जर्नलिझमच्या प्राचार्या वादात!

कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची तुलना ही महामानव अथवा भारतीय राज्यघटनेशी होऊ शकत नाही. त्यामुळे कदम यांनी तत्काळ रेखा शेळके यांना बोलावून घेत घडल्या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यानंतर शेळके यांनी माफीनामा लिहून दिला.

सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे, बलराज दाभाडे,बाळूभाऊ वाघमारे,मनीष नरवडे,प्रथम कांबळे,राहुल खंडागळे,नवल सूर्यवंशी,अमोल भालेराव,मिलिंद दाभाडे,बंटी नवगिरे,सागर प्रधान,सुबोध जोगदंडे,विशाल बनकर,योगेश म्हस्के, आदी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

समस्त आंबेडकरी अनुयायी, काल दिनांक १२/१२/२०२१ रोजी माझ्या फेसबूक पेजवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाविषयी अनवधानाने चुकीचा उल्लेख झाला. घडला प्रकार हा चुकीचा माझ्या लक्षात आले. यामुळे अनेकांची मने दुखावली असतील. त्याबाबत जाहीर माफी मागते, असे डॉ. शेळके यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा