एमआयएमचे वारिस पठाण यांना विनापरवानगी सार्वजनिक वक्तव्ये करण्यास खा.ओवेसींची बंदी

0
318
संग्रहित छायाचित्र.

हैदराबाद/औरंगाबादः  आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी आहोत, असे वादग्रस्त विधान केलेले भायखळ्याचे आमदार आणि एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांच्यावर पक्षाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एमआयएमचे प्रमुख खा. असदोद्दिन ओवेसी यांनी ही घोषणा केली.

 कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएए- एनआरसीविरोधात आयोजित सभेत बोलताना वारिस पठाण यांनी खा. ओवेसी यांच्या उपस्थितीतच आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी आहोत, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतरही माफी मागण्यास नकार देत वारिस पठाण यांनी आपण संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोलल्याचे सांगत आपल्या विधानाचे समर्थन केले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्य एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनाच आवडले नाही. त्यामुळे त्यांनी वारिस पठाण यांना चांगलेच फटकारले आहे. एकीकडे ओवेसी यांनी हा बंदी आदेश काढला असतानाच दुसरीकडे वारिस पठाण यांनी हे वक्तव्य का केले, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात येणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

भाजपने बी टीम ऍक्टिव्हेट केलीय- राष्ट्रवादीः आपल्या एकतेच्या बळावर देशातील जनता सीएए आणि एनआरसीविरोधात लढा देत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यामुळे भाजपने आपल्या बी टीमला ऍक्टिव्हेट केले आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि एमआयएमवर टिकास्त्र सोडले आहे.  अशा भेदभाव करणाऱ्या वृत्तीपासून सतर्क रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा