एमआयएमच्या ऑफरवरून धुळवड तरीही मुख्यमंत्री ठाकरे-पवारांच्या भेटीवर इम्तियाज जलील ठाम

0
163
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन महत्वाच्या घटक पक्षांना युती करण्याची ऑफर दिल्यामुळे राज्यात खरीखुरी धुळवड संपल्यानंतर राजकीय धुळवड रंगली असतानाच आणि शिवसेनेबरोबरच काँग्रेस- राष्ट्रवादीनेही एमआयएमसोबत युती अशक्य असल्याचे स्पष्ट केले असतानाच खा. जलील मात्र त्यांच्या प्रस्तावावरून मागे हटायला तयार नाहीत. तुमचा आणि आमचा शत्रू एकच आहे, तो म्हणजे भाजप. मग शेवटी ध्येय्य एक असेल तर रस्ते वेगळे का? असा सवाल करत जलील यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन माझे म्हणणे त्यांच्या कानावर टाकणार आहे, असे म्हटले आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी जलील यांचे वर्गमित्र आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यांच्या निवासस्थानी गेले असता एमआयएमने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच महाविकास आघाडीशी युती करण्याची ऑफर दिली. त्यांनी दिलेल्या या ऑफरमुळे राज्यात राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या ऑफरवरून भाजपने शिवसेनेला जनाब सेना म्हणत टिकास्त्र सोडले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एमआयएमशी युती अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आता डाव पहा… काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का?  हाच खरा डाव आहे. एमआयएमने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपने यावरून टिकेचा भडीमार सुरू करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही. आम्ही भाजपसारखे सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणे शक्य नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानांतर्गत सर्व खासदार आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही एमआयएमने आधी ते भाजपची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावे आणि मग बोलावे, असे स्पष्ट करत युती शक्य नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसनेही अशीच भूमिका मांडली. तरीही खा. इम्तियाज जलील हे आपल्या प्रस्तावावरून मागे हटायला तयार नाहीत.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, हा आरोप कधीपर्यंत करणार आहात?  शेवटी तुमचा आणि आमचा शत्रू एकच आहे, तो म्हणजे भाजप… मग शेवटी ध्येय्य एस असेल तर मग रस्ते वेगळे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना भेटून मी यासंदर्भातील चर्चा करेन. मुख्यमंत्री हे राजकीय पक्षाचे असू शकत नाहीत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मला आदर आहे. मी खासदार असून मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही, असे मला कुणी सांगू शकत नाही. मी त्यांना भेटणार. भेटून चर्चा करणार. कमीत कमी मला काय म्हणायचे आहे, हे तरी ते ऐकून घेतील, असे खा. जलील यांनी म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

आपण चर्चा तर करूया ना. तुम्ही कधीपर्यंत फक्त हिंदुत्ववादी-हिंदुत्ववादी म्हणणार आहात?  हे कधीपर्यंत चालणार? भाजप-शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या लढाईमुळे आज देश कुठे चालला आहे?  आपल्याला देशाची, राज्याची चिंता आहे की फक्त हिंदुत्वाचा जप करणार आहात?  मग राज्यातील दुसऱ्या समाजाचे आपण मुख्यमंत्री नाहीत का?, असे जलील यांनी म्हटले आहे.

कोण काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या नकारानंतरही हार मानणार नाहीः भावनिक आणि विविध कळीचे मुद्दे घेऊन राजकारण करणे हा राजकीय पक्षांचा धंदाच झालेला आहे. यातून आता बाहेर पडणे गरजेचे आहे. हाच विचार घेऊन मी पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. आम्ही एक मिशन घेऊन निघालो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या एका नकारानंतर आम्ही नाराज झालो किंवा हार मानली, असे अजिबात नाही. एवढ्यात पराभवाची चर्चा करणेही योग्य नाही.

  • खा. इम्तियाज जलील, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष औरंगाबादेत

हेही वाचाः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या ‘गुणवत्तेच्या आधारे’ निवड झाल्याच्या दाव्यातही खोटच, ही वाचा वस्तुस्थिती…

जलील यांनीच राष्ट्रवादीत यावेः एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पक्षाच्या राजीनामा देऊन यावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे काम करावे. तसे झाल्यास आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हे इम्तियाज यांना राष्ट्रवादीत नक्कीच घेतील.

  • छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री निफाडमध्ये

एमआयएमची ऑफर हे भाजपचे मोठे कटकारस्थानः औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांशी कधीही युती होऊ शकत नाही. या राज्यात कोणीही एमआयएमबोसत जाणार नाही. शिवसेनेला एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मोठे कटकारस्थान आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजप एमआयएमचा वापर करत असून त्या उद्दिष्टाने अशा प्रकारच्या ऑफर समोर आणल्या जात आहेत.

  • संजय राऊत, शिवसेना खासदार, मुंबईत

भाजपविरोधी असल्याचे आधी सिद्ध कराः भाजपला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडीशी युती करायला तयार आहे, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या पक्षाच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीतून मात्र तसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्याबाबत चर्चा केली पाहिजे.

  • अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मुंबईत

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा