एमआयएम पुन्हा वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी करणार, विधानसभा निवडणूक एकत्रच लढणार

0
753

औरंगाबादः जागावाटपाच्या प्रश्‍नावर असमाधान व्यक्त करत विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा करणार्‍या एमआयएमनेच आता वंचित बहुजन आघाडीशी पुन्हा हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली असून आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्यास एमआयएम उत्सूक असल्याचे स्पष्ट संकेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार  इम्तियाज जलील यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणूक एकत्र लढवून एमआयएम- वंचित बहुजन आघाडीने राज्यातील राजकीय समीकरणेच बदलून टाकली होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत सुमारे 41 लाख मते मिळवली होती. त्या पार्श्वभूमीवर  वंचित बहुजन आघाडी- एमआयएम एकत्रितपणे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे गेल्यास राज्याच्या विधानसभेतील चित्र वेगळे असू शकते, असे राजकीय आडाखे बांधले जात असतानाच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेत एमआयएम स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवणार असल्याची घोषणा करून टाकली. एमआयएमचा हा निर्णय वंचित बहुजन आघाडीसोबतच एमआयएमचे कार्यकर्ते आणि बहुतांश नेत्यांनाही आवडला नव्हता.

वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर खा. जलील यांनी एमआयएमच्या उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू केल्या आणि तीन उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करून टाकली. हे करत असतानाच एमआयएम पुन्हा वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करत असून एमआयएमचे प्रमुख असदोद्दिन ओवेसी यांनीही जागांबाबात तडजोड करून वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढवण्याची तत्वतः तयारी दाखवली आहे.  पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एनडीटीव्ही इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे आधी 98 जागांची व नंतर 58 जागांची मागणी केली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला 8 जागा देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तोडत असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. जलील यांनी जाहीर करून टाकले होते. वंचित बहुजन आघाडीशी युती तोडण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष ओवेसी यांच्या सल्ल्यानेच घेतल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर जलील यांची भूमिका एमआयएमची अधिकृत भूमिका असल्याचे खुद्द ओवेसी यांनीच सांगितल्यानंतर या फाटाफुटीवर शिक्कामोर्तब झाले होते.

त्यातच आता एमआयएमकडून वंचित बहुजन आघाडीशी युतीचा पुनर्विचार सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. वंचित बहुजन आघाडी- एमआयएमची युती पुन्हा होणे अवघड नाही. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मोठा भाऊ या नात्याने जागा वाटपावर तोडगा काढला तर पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची आम्ही इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांनी ओवेसींशी पुन्हा चर्चेची तयारी दाखवली तर आम्हीही तयार आहोत, असे खासदार जलील यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.  वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात पुन्हा आघाडी होईल का, या प्रश्‍नाचे होकार्थी उत्तर देत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. राज्यातील मतदारांना वेगळा पर्याय हवा आहे. राज्यातील मतदार वंचित-बहुजन आघाडी- एमआयएमकडे असा भक्कम पर्याय म्हणून पहात आहेत, असे जलील म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा