भाजप नेत्यांना ‘अंधश्रद्धे’ने पछाडले; केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, पावसात भिजले की यश मिळतेच!

0
435

औरंगाबादः सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुंवाधार पावसात घेतलेल्या सभेमुळे पावसात भिजले की यश हमखास मिळतेच, अशी ‘अंधश्रद्धा’च जणू भाजप नेत्यांच्या मनात घर बसली की काय अशी शंका यावी, असाच प्रकार आज औरंगाबादेत घडला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज भरपावसात औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केले. पावसात भिजणाऱ्यांना हल्ली चांगले यश मिळते. आता नाही तर कदाचित हे पुढचे संकेत असतील, अशी मखलाशी करत त्यांनी भरपावसात भाषणही ठोकले.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राजू शिंदे यांचीही उपस्थिती होती.

 दानवे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर ते भाषणासाठी उभे राहिले आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली. येऊ द्या पावसाला येऊ द्या. पावसात भिजणाऱ्यांना हल्ली चांगले यश मिळते. आता नाही पण कदाचि हे पुढचे संकेत असू शकतात. त्यामुळेच मी भाषणाला उभा राहिलो आहे, अशी मखलाशीही दानवे यांनी केली. त्यांच्या खास शैलीतील भाषणाला उपस्थितांनाही हास्यकल्लोळ करत आणि टाळ्या वाजवत भरभरून दाद दिली.  यावेळी दानवेंच्या डोक्यावर एकाने छत्री धरली, तर मंचावरील अन्य उपस्थितांना अन्य कार्यकर्त्यांनी छत्रीचा सहारा दिला.

 दानवे यांनी या वेळी महाविकास आघाडी सरकारवरही भाष्य केले. राज्य सरकारचे स्टेअरिंग कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या हातात असते. हे स्टेअरिंग एकाच्याच हातात असायला हवे. नाही तर मोठा अपघात घडल्याशिवाय राहणार नाही, असेही दानवे म्हणाले. राज्य सरकारने मका खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करावी, आमची मुदतवाढ देण्याची तयारी आहे, असेही दानवे म्हणाले.

विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली होती. ही सभा तुफान गाजली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले यांचा दणदणीत पराभवही झाला होता. या एकाच पावसाळी सभेने राज्याच्या राजकारणाचा नूर पालटल्याची जोरदार चर्चाही महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली होती. त्या सभेचे पडसाद आणि धास्ती भाजप नेत्यांच्या मनात अजूनही कायम असल्याचेच आजच्या प्रसंगावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच पावसात भिजले की यश मिळतेच, ही अंधश्रद्धा भाजप नेत्यांच्या मनात घर करून बसली की काय अशी चर्चाही उपस्थितांमध्ये रंगली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा