‘टुकडे- टुकडे गँग’ भाजप नेत्यांच्या मनातील मांडे, शाहांच्या गृह मंत्रालयाकडेच ‘गँग’ची माहिती नाही!

0
124
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 2016 मध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बहुतांश भाजप नेत्यांकडून ज्या ‘टुकडे-टुकडे गँग’चा वारंवार उल्लेख करून भांडवल करण्यात आले, त्या ‘टुकडे-टुकडे गँग’बद्दल अमित शाह यांच्याच गृहमंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे देशात ‘टुकडे-टुकडे गँग’ अस्तित्वातच नाही, ती केवळ अमित शाह यांच्या संकल्पनेत आहे, असा टोला माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी हाणला आहे.

माजी पत्रकार आणि कार्यकर्ते साकेत गोखले यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करून ‘देशात ‘टुकडे-टुकडे गँग’ कशी आणि केव्हा अस्तित्वात आली?  या गँगचे सदस्य कोण आहेत? या गँगवर यूएपीए अंतर्गत (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) बंदी का घालण्यात आली नाही?’  अशी विचारणा केली होती. गोखले यांच्या अर्जाला केंद्रीय गृह मंत्रालयाने 20 जानेवारी दिलेल्या उत्तरात ‘गृह मंत्रालयाकडे ‘टुकडे-टुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. साकेत गोखले यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

‘टुकडे-टुकडे गँग’चा देशात विभाजन घडवण्याचा डाव असल्याचा आरोप अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या भाषणात वारंवार होत आला आहे. सरकारला सवाल करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘टुकडे-टुकडे गँग’चा सदस्य ठरवण्याचे प्रकारही भाजप नेत्यांकडून अनेकदा झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकारांतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे अमित शाहाच तोंडघशी पडले आहेत. आता आपण निवडणूक आयोगाकडे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध तक्रार करणार आहोत, असे साकेत गोखले यांनी जाहीर केले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी भाषणांमध्ये ‘टुकडे-टुकडे गँग’ शब्दाचा वापर का केला, याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे किंवा लोकांशी खोटे बोलून त्यांची दिशाभूल केल्याबद्दल अमित शाह यांनी जाहीरपणे माफी मागावी, असे गोखले यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा