आळंदीत वारकरी संप्रदायाचे धडे गिरवणाऱ्या ११ वर्षीय मुलाशी संस्थाचालकाचेच अनैसर्गिक कृत्य

0
781
प्रातिनिधिक छायाचित्र.

आळंदीः वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका ११ वर्षीय मुलावर आळंदी परिसरातील एका वारकरी संस्थाचालकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ याला पोलिसांनी गजाआड केले आहे.

दोन महिन्यांपूर्वीच पीडित ११ वर्षीय मुलाला त्याच्या आईवडिलांनी आळंदी परिसरातील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. शिवप्रसाद भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायाचे ‘शिक्षण’ देत होता.

घरी पाहुणे आल्यामुळे पीडित मुलाला त्याच्या आईने घरी आणले होते. तेव्हा भोकनळने पीडित मुलाला लगेचच संस्थेत परत पाठवा, असे त्याच्या आईवडिलांना सांगितले. मात्र संस्थेत परत जायचेच नाही, म्हणून हा मुलगा रडायला लागला. मुलगा रडतो हे पाहून त्याच्या आईने विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता त्यामुलाने आपबीती सांगितली.

शिक्षण संस्थेतील सर्व मुले हरिपाठ करण्यासाठी जात असताना शिवप्रसाद भोकनळने ११ वर्षीय मुलाला तुझ्याकडे काम आहे, असे सांगून त्याला थांबवून घेतले. सर्व मुले निघून गेल्यावर शिवप्रसादने या मुलाला एका खोलीत नेले आणि त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुला बघून घेईन, अशी धमकीही शिवप्रसादने पीडित मुलाला दिली. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शिवप्रसाद भोकनळला गजाआड केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा